Breaking News

अमेरिकाचा जळफळाट !रशिया आणि अमेरिका दोन्ही प्रभावशाली देश असले तरी ते इतर देशांना आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करतांना दिसून येत आहे. मग ती विविध करारांच्या दृष्टीने असेल किंवा, शस्त्रास्त्र करार असेल. किंवा विकासाच्या वाटा शोधण्यासाठी कर्जांची मदत असेल. दोन्ही देश सार्वभौम आणि संपन्न असल्यामुळे आपला दरारा प्रस्थापित करण्यासाठी इतर देशांवर धाक निर्माण करण्याचा, तर कधी जवळीक साधण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात येतो. अमेरिका हा संधीसाधू देश असून, अनेक वेळेस पाकिस्तानला मदत करून, भारताला शह देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पाकिस्तानमधून होणारे आत्मघातकी हल्ले, दहशतवाद्यांचे अड्डे या सर्वांना पाकिस्तानने अभय दिल्यानंतर देखील अमेरिकेकडून पाकची पाठराखण सातत्याने सुरू होती. मात्र जेव्हा अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला, तेव्हा अमेरिकाने कडक धोरण स्वीकारत, पाक व अफगाणिस्तानमधील दहशतवादाची तळांवर हल्ले चढवले. त्यातूनच ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यात आला. अमेरिका आणि पाकिस्तानचे संबध दाखवण्याचे कारण म्हणजेच भारत-रशिया यांच्यात एस-400 क्षेपणास्त्रे खरेदीचा जो करार झाला, त्याला असलेला अमेरिकेचा विरोध. रशियाने हे क्षेपणास्त्र सिस्टिम 1990 मध्ये डेव्हलप केले. हेच क्षेपणास्त्र सिस्टिम 2007 पासून रशियाच्या लष्करात आहे. अतिदूर पल्ल्याच्या क्षेपणास्त्र सिस्टिमचा जवळपास 400 किमी अंतरापर्यंत मारा होणार आहे. तर दूर पल्ल्याचे क्षेपणास्त्र सिस्टिम 250 किमी अंतरापर्यंत मारा करू शकते. 

भारताने इराणकडून तेल खरेदी करू नये, असा दबाव अमेरिकेने टाकला होता. ही गोष्टी ताजी असताना आता पुन्हा भारत-रशियाच्या संबंधाकडे अमेरिका डोळे वटारून पाहू लागली आहे. रशियाकडून भारताने एस-400 क्षेपणास्त्रे सिस्टिम खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा करार झाल्यास अमेरिका भारतावर निर्बंध घालण्याची दाट शक्यता आहे. तसे संकेतही अमेरिकेने दिले आहेत. कारण, चीनने रशियाकडून क्षेपणास्त्र खरेदी केले आहेत. त्यानंतर अमेरिकेने चीनवर निर्बंध घातले आहेत. रशिया एकीकडे आपले क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान विकत असतांना, दुसरीकडे इतर देश क्षेपणास्त्रसंपन्न होणार नाही, यासाठी अमेरिका दबाब आणू पाहत आहे. पुतिन यांचा भारत दौरा लक्षात घेऊन पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिकेकडे धाव घेतली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी अमेरिकेचे राज्य सचिव माईकपोम्पओ यांची भेट घेऊन चर्चा केली. अमेरिकेचा मुड लक्षात घेऊन पाकिस्तान राजकीय डाव रचत आहे, हे स्पष्ट होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले महत्व अधोरेखित करण्यासाठी व संरक्षणाच्या दृष्टीने संपन्न अशा क्षेपणास्त्र खरेदीसाठी भारताचे अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. मात्र हा करार शेवटच्या टप्प्यात पोहचत नव्हता. अखेर रशियाच्या राष्ट्रध्यक्षांनी या कराराला मान्यता दिली, आणि अमेरिकाचा जळफळाट झाला. भारताने रशियाकडून क्षेपणास्त्र सिस्टिम खरेदी करू नये, यासाठी अमेरिकेने लाख प्रयत्न केले. याचाच फायदा पाकिस्तान करून घेत आहे. आपली पोळी भाजून घेत आहे. कारण अमेरिकेने पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी केली आहे. भारत-रशियाच्या जवळीकतेचा मुद्दा करून पाकिस्तान अमेरिकेच्या जवळ जाण्याची संधी शोधत आहे. आंतरराष्ट्रीय भारताचे वाढते महत्व अमेरिकेसारख्या देशासाठी डोकेदुखी ठरतांना दिसून येत आहे. एकीकडे पाकबरोबरच चीनचा होणारा जळफळाट त्यातच अमेरिकेचा दबाव, यातून मार्ग काढून भारताला या देशांशी चांगले संबध प्रस्थापित करावे लागणार आहे. एकाच वेळी सगळयांशी शत्रुत्व घेऊन, पुढील विकास साधणे शक्य नाही. अमेरिकेचा विरोध झुगारून भारत रशियाकडून क्षेपणास्त्र सिस्टिम खरेदी करत आहे. पुतिन आणि मोदी यांच्यात क्षेपणास्त्र सिस्टिम खरेदीसह अमेरिकेने इराणवर लावलेल्या प्रतिबंधाच्या पार्श्‍वभूमीवर कच्च्या तेलाची स्थिती, द्विपक्षीय संबंध, क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. तसेच दोन्ही देशातील व्यापार, गुंतवणूक, संपर्क, ऊर्जा, अंतराळ, पर्यटनसहित विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्यादृष्टीने विचार केला जाईल.