Breaking News

स्वरझंकार कार्यक्रमास नगरकरांचा प्रतिसाद


नगर । प्रतिनिधी -
व्हायोलिन अकादमी पुणे व सरगमप्रेमी मित्रमंडळाच्या वतीने आयोजित स्वरझंकार या विशेष संगीत सभेत संदीप रानडे यांचे शास्त्रीय गायन व जागतिक कीर्तीचे मोहनवीणा वादक पंडित विश्वमोहन भट्ट यांचे वीणावादनाने नगरकर मंत्रमुग्ध झाले.

सावेडीतील माऊली सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सचे शशांक, लोकमान्य मल्टीपर्पजचे प्रवीण जाधव, पवन नाईक, महेश लेले, मनीष बोरा, संदीप रानडे, रोहित मराठे व रोहित मुजूमदार यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आले. संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध हार्मोनियम वादक तुळशीराम बोरकर, प्रसिद्ध व्हायोलिन वादक डी. के. दातार, सतार वादिका अन्नपूर्णा देवी यांना आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात पंडित जसराज यांचे शिष्य संदीप रानडे यांच्या शास्त्रीय गायनाने झाली. रानडे यांनी समयोचित राग मधुवंती सादर केला. मेहेमाणसे ही प्रसिद्ध बंदिश, विलंबित एक तालात सादर केली. स्वरातील धीरगंभीर स्वर संगीताने सभागृहातील वातावरण भारावले. आकर्षक स्वरलगाव रागाची सुयोग्य बढत बोलताना व सरगमचा तानबाजीने श्रोते मंत्रमुग्ध झाले. याच रागातील छोटा ख्याल काहे मान करो सखी अब ही, द्रुत, तीन तालातील बंदिश व तराणा सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली. त्यांना तबल्यावर रोहित मुजुमदार व हार्मोनियमवर रोहित मुजूमदार यांची साथ मिळाली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पंडित विश्वमोहन भट यांचे वीणावादन झाले. पंडितजींनी श्याम कल्याण रागाने आपल्या सादरीकरणास सुरुवात केली. आलाप, जोड, झाला हे वादनातील विविध प्रकार सादर करून द्रुत तीन तालातील जुगलबंदी मैफिलीचे आकर्षण ठरली. प्रचंड टाळ्या देऊन श्रोत्यांनी दाद दिली. श्रोत्यांची फर्माइशही पंडितजींनी पुरी केली, तसेच श्रोत्यांनाही गायनात सहभागी करून घेतले. त्यामुळे श्रोते व पंडितजींचे सांगीतिक नाते अगदी जवळ आले. श्रोत्यांची दाद पाहून पंडितजी भारावले. शेवटी वंदे मातरम् व गांधीजींचे भजन रघुपती राघव राजाराम सादर करून कार्यक्रमाची सांगता केली. तबल्याची साथ मुकेश जाधव यांची होती. याच मैफिलीत नगरचे सुप्रसिद्ध शिल्पकार व चित्रकार प्रमोद कांबळे यांनी पंडितजींचे तैलरंग चित्र बनवले. पंडितजींनी त्यांचे कौतुक केले. संपूर्ण सभागृह प्रचंड टाळ्यांनी निनादून गेले. या कार्यक्रमाचे समर्पक निवेदन आकाशवाणी कलाकार वीणा दिघे यांनी केले. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स होते. सहप्रायोजक रिलायन्स डिजिटल विलो, बँक ऑफ महाराष्ट्र, लोकमान्म मल्टीपर्पज व सिस्का एलईडी लाईटस् हे होते.