Breaking News

दुष्काळग्रस्त भागाचा आढावा पालकमंत्री घेणार; राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयमुंबई/प्रतिनिधी : राज्यातील 190 पेक्षा जास्त तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या तालुक्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा मंत्री तसेच पालकमंत्री घेणार आहेत. यासंदर्भातील निर्णय आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा आढावा घेतला. यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. 2016 च्या मॅन्युअलमध्ये केंद्राने याबाबत निकष तयार केले आहेत. त्यानुसार माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्यात पाणी टंचाई असणार्‍या तालुक्याचा दौरा करून पुढील कारवाई केली जाणार आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांसंदर्भात 31 ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात येणार आहे. यानंतर केंद्राला माहिती दिली जाणार आहे. केंद्राच्या पाहणीनंतर राज्यात दुष्काळ जाहीर करण्याबाबत निर्णय घेण्याचा विषय मार्गी लावला जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, पाणीसाठ्याबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत सर्व मंत्री, राज्यमंत्री हे तालुक्यात जाऊन टंचाईबाबत आढावा घेणार आहेत. यामध्ये पालकमंत्री, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री आदींचाही समावेश असणार आहे. सर्व मंत्री 31 ऑक्टोबरच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांना राज्यातील स्थितीचा आढावा सादर करणार आहेत.

राज्यातील अनेक भागात दुष्काळसदृश्य परिस्थीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी आणि विरोधकांकडून करण्यात येत होती. त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर महिनाअखेपर्यंत दुष्काळ जाहीर करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर, मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळी तालुक्यांचा दौरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्याच्या बहुतांश भागात यंदा 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेला असल्याने केंद्र शासनाने जाहीर केलेल्या निकषांनुसार राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. या संदर्भात आढावा घेऊन 31 ऑक्टोबरपर्यंत राज्यात दुष्काळ घोषित केला जाईल. केंद्रीय समितीने पाहणी केल्यानंतर याचा निर्णय होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले होते.

दुष्काळाचा आढावा 
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि परिवहनमंत्री दिवाकर रावतेयांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या दोन मंत्र्यांच्या नेतृत्वात दुष्काळी भागातील पालकमंत्री संबंधित तालुक्यांचा दौरा करतील. या दौर्‍यात दुष्काळी भागांची पाहणी करुन संबंधित अहवाल सादर करतील, त्यांनंतर आढावा घेऊन दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे.