Breaking News

‘जय हिंद’च्या खेळाडूंचे राज्यस्तरीय स्पर्धेत सुयश


संगमनेर प्रतिनिधी 

वेरुळ येथे दि. ७ ते १० यादरम्यान झालेल्या राज्यस्तरीय सबज्युनिअर व ज्युनियर वुशू अजिंक्यपद स्पर्धेमध्ये संगमनेरच्या जय हिंद स्पोर्ट क्लबच्या खेळाडूंनी अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत घवघवीत यश मिळविले, अशी माहिती प्रशिक्षक मिलिंद औटी यांनी दिली. 

या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये ३२ जिल्ह्यातील सुमारे ७५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. वुशू खेळातील तावलू प्रकारात कार्तिक कानवडे ( तीन सुवर्ण ), तृष्णा औटी ( एक सुवर्ण, एक रौप्य ), मोक्षदा औटी ( सुवर्ण ), आयर्न वाघ (कांस्य ), सर्वज्ञ खटाटे ( कांस्य) निल औटी ( कांस्य ) असे पाच सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्यपदक मिळविले. वुशू हा मार्शल आर्टमधील क्रीडा प्रकार आहे. शालेय स्तरापासून नॅशनल गेम्स, ऐशियन गेम्स व ऑलम्पिक गेम्समध्ये तो समाविष्ट आहे. नुकत्याच जर्काता येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये वुशू खेळाने भारताला पाच पदके मिळवून दिली आहेत. ‘जयहिंद’च्या या खेळाडूंमधील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची दि. ६ ते १० डिसेंबर रोजी चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली असून ते महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या सर्व खेळाडूंना मिलिंद औटी यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान, या सर्व यशस्वी खेळाडूंचे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ सुधीर तांबे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.