Breaking News

दरेवाडी येथे विस्‍तारीत समाधान योजनेंतर्गत शिबीर संपन्‍न


अहमदनगर  - प्रशासनाने समाजातील शेवटच्‍या माणसाचा विचार केला पाहिजे या महात्‍मा गांधीचे विचार कृतीमध्‍ये उतरविण्‍यासाठी अशा स्‍वरुपाच्‍या शिबीरांची आवश्‍यकता आहे. महाराजस्‍व अभियांनातर्गत प्रशासन लोकांच्‍या शेवटच्‍या घटकापर्यत जाऊन त्‍यांच्‍या समस्‍यांचे निराकरण करते. ग्रामीण भागात तलाठी, ग्रामसेवक यांचे समाजजीवनात मोठे महत्‍व आहे. त्‍यांच्‍याकडूनच समाजातील छोटया समस्‍यांचे निराकरण होते. असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.

नगर तालुक्‍यातील दरेवाडी येथे महाराजस्‍व अभियानांतर्गत समाधान योजना शिबीरात ते बोलत होते. यावेळी आमदार शिवाजी कर्डिले, अप्‍पर जिल्‍हाधिकारी भानुदास पालवे, नगर भागचे उपविभागीय अधिकारी उज्‍वला गाडेकर, तहसीलदार अप्‍पासाहेब शिंदे, भारतीय जनता पक्षाचे जिल्‍हाध्‍यक्ष भानुदास बेरड, दरेवाडीचे सरपंच अनिल करांडे आदि उपस्थित होते.

महाराजस्‍व अभियानांतर्गत विस्‍तारीत समाधान योजनेचे शिबीर जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे मार्गदर्शन व अध्‍यक्षतेखाली यशस्‍वीरित्‍या राबविण्‍यात आले. या शिबीरामध्‍ये रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र, मतदार नोंदणी, आधार नोंदणी, बँकेचे खाते उघडणे, मुद्रा लोण, कृषी विभागामार्फत राबविण्‍यात येत असलेल्‍या विविध योजनांची माहिती, संजय गांधी योजना, कुटूंब नियोजन कार्यक्रम, रेशीम उद्योग प्रशिक्षण, पशुचिकित्‍सा मार्गदर्शन, ड्रायविंग लायसन, मोफत नेत्र तपासणी व चिकित्‍सा इत्‍यादी सेवा नगर तालुक्‍यातील नागरिकांना पुरविण्‍यात आल्‍या होत्‍या.

आमदार शिवाजी कर्डिले यांनी जिल्‍हाधिकारी द्विवेदी यांच्‍या कामाचे कौतुक केले. ते म्‍हणाले, सीना नदीतील अतिक्रमण, मोहरम व गणेश उत्‍सवाचे यशस्‍वी नियोजन केले. तसेच प्रभारी आयुक्‍त म्‍हणून महापालिकेतील काम कौतुकास्‍पद असल्‍याचे देखील नमूद केले. संजय गांधी योजनेचा लाभ मिळण्‍यासाठी उत्‍पन्‍न मर्यादा 21 हजार रुपयांवरुन 50 हजार रुपये करावी. तसेच योजने अंतर्गत मिळणारी रक्‍कम 600 चे ऐवजी 5 हजार मिळावेत असे ठराव मांडले. या ठरावास भानुदास बेरड यांनी अनुमोदन केले व हा प्रस्‍ताव तातडीने मुख्‍यमंत्री महोदयाकडे पाठविण्‍याचे जिल्‍हाधिकारी द्विवेदी यांनी आश्‍वासन दिले. तदनंतर ग्रामस्‍थांना प्रमुख पाहुण्‍याच्‍या उपस्थितीत जातीचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, राष्‍ट्रीय कुटूंब लाभ योजनेचे धनादेश तसेच विविध योजनांचे प्रमाणपत्रांचा लाभ देण्‍यात आला.

अप्‍पर जिल्‍हाधिकारी भानुदास पालवे म्‍हणाले, समाधान योजनेच्‍या माध्‍यमातून महसूल प्रशासन व इतर विभाग हे नेहमीच जनतेमध्‍ये येऊन जनतेचे प्रश्‍न सोडविण्‍याचा प्रयत्‍न करीत असतात असे सांगितले.