Breaking News

वॉटर कपसाठी ग्रामस्थांनी सहाय्य करावे ः साळुंखे

कलेढोण, दि. 5 (प्रतिनिधी) : कलेढोण ग्रामस्थांनी वॉटर कप स्पर्धेसाठी सर्वतोपरी सहाय्य करावे, असे आवाहन संजीव साळुंखे यांनी केले. कलेढोण, ता. खटाव येथे महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित ग्रामसभेत ते बोलत होते.साळुंखे म्हणाले, कलेढोण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासकामांत नेहमीच सक्रीय आहोत. तसेच यावर्षी सर्व ग्रामस्थांनी मिळून येणार्‍या वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा मार्च महिन्यात सुरू होत असली तरीही ग्रामस्थांच्या देणग्यांमधून ओढा खोलीकरण व रुंदीकरणचे काम सुरु केले. त्या बांधावर वृक्ष लागवड करण्यात आली.
कलेढोणमधील सर्व वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांनी यात सक्रीय सहभाग घ्यावा. जिथे जिथे पाणी अडवता येइल, त्याठिकाणी बांध घातले जावेत. श्रमदान केले जावे. त्याचबरोबर गावातील सर्व पक्षातील नेते मंडळींनी गट-तट विसरुन या कामात सहभागी व्हावे. विकासकामांना कोणीही अडथळे न आणता मनातील द्वेष राजकीय स्वार्थ व हितसंबध बाजूला ठेवून या कामात एकजुटीने एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी कलेढोण ग्रामस्थांनी एकमताने सहभागी होण्याचा निर्णय घेतला व ग्रामसभेत ठराव करण्यात आले. यावेळी कलेढोण ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामपंचायत, सदस्य सर्व प्रशासकीय पदाधिकारी तसेच गावातील सर्व महिला युवक व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.