Breaking News

साईंच्या दरबारी ही खोटेपणाच !


शिर्डीसारख्या पवित्र ठिकाणी येऊन पंतप्रधान खोटं बोलण्याचं दु:साहस करत आहेत. आता साईबाबांनीच पंतप्रधानांना खरं बोलण्याची सद्बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना आपण साईबाबांना करणार असल्याचा टोला चव्हाण यांनी लगावला. शिर्डी दौर्‍यात मोदी यांनी नंदुरबारचा चहावाला, सातार्‍याचे आपले गुरू लक्ष्मणराव इनामदार आणि सोलापूरचे हातमागावर विणलेलं जॅकेट, असा गौरवपूर्ण उल्लेख केला. मात्र, सोलापूरबाबत पंतप्रधानांनी केलेल्या उल्लेखानं सोलापूरकर आश्‍चर्यचकित झाले आहेत. कारण सोलापूरमध्ये जॅकेटची निर्मिती कधीच केली जात नाही. त्यामुळं मोदी यांचं इथंही हसूच झालं आहे. सोलापूरच्या चादरी आणि टॉवेल प्रसिद्ध आहेत. चादरी आणि टॉवेल उत्पादनाशिवाय अलिकडं तयार कपडयांच्या उत्पादनाच्या क्षेत्रातही हळुहळू सोलापूरचं नाव घेतलं जाऊ लागलं आहे. याव्यतिरिक्त येथे थोडयाफार प्रमाणात बेडशिटचं उत्पादन केलं जातं. हातमागावर विणलं जाणारं जॅकेट सोलापुरात अजिबात तयार होत नाही. जॅकेट उत्पादन आणि सोलापूर यांचा अजिबात संबंध नाही. त्यामुळं जॅकेट उत्पादनात कधीच सोलापूरची ओळख नव्हती. ही वस्तुस्थिती लक्षात घेता मोदी यांनी स्वत: सोलापूरच्या हातमागावर विणलेल्या जॅकेटचा आवर्जून उल्लेख करावा, हे खरोखरच आश्‍चर्यकारक आणि धक्कादायक आहे. 

निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्‍वासनं पूर्ण करता येत नाहीत, हे समजण्यासारखं आहे ; परंतु जेव्हा आपण केलेल्या कामाची माहिती देतो, ती तरी चुकीची असू नये, एवढी खबरदारी संबंधितांनी घ्यायला हवी. त्यातही एखाद्या देवाच्या ठिकाणी आपण जातो, तेव्हा तरी किमान आपण खोटं बोलू नये, एवढं तारतम्य बाळगायला हवं. त्यातही जे देव, धर्म मानतात किमान ते मानत असल्याचा आव आणतात, अशा पक्षाच्या नेत्यानं, पंतप्रधानांनं तरी देवाचिया द्वारी खोटं न बोलण्याचं पथ्य पाळायला हवं होतं ; परंतु राजकीय नेत्यांची गणना आता थापाड्यात होत असून त्याला पंतप्रधानही अपवाद नाहीत, हे त्यांनी त्यांच्याच वर्तणुकीतून दाखवून दिलं आहे. मोदी यांचा शिर्डीचा दौरा महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी होता, हे लपून राहिलेलं नव्हतं. वास्तविक ते ज्या कारणासाठी आले होते, त्या कारणाचं औचित्य पाहता पंतप्रधानांनी आपल्या भाषणाला राजकीय स्वरुप देणं चुकीचंच होतं. साईबाबांच्या समाधीच्या शताब्दीचं वर्ष असताना गेल्या वर्षभरात केंद्र व राज्य सरकारनं शिर्डीसाठी काहीच मदत केली नाही. उलट, साईंच्या झोळीत हात घालून दोनशे कोटी रुपये काढून नेले. या परिस्थितीत शिर्डीसाठी काही देण्याची घोषणा त्यांनी केली असती, तर ते औचित्याला धरून झालं असतं. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळाची तीव्रता लक्षात आणून दिली होती. त्यानुसार मदत केली असती, तर त्यामुळं महाराष्ट्राला आनंद झाला असता ; परंतु झालं उलटंच. महाराष्ट्र दुष्काळानं होरपळत असताना मोदी मात्र जलसशिवार योजनेचं कौतुक करण्यात गुंतले होते. राज्यात परिस्थिती काय आपण बोलतो काय याचं भान त्यांना राहिलेलं नव्हतं. भाजप सरकारनं पूर्वीच्याच सरकारच्या योजनांची नावं बदलून ती स्वतः च्या नावावर खपविली. गांधी-नेहरू घराण्याच्या रागातून ही नावं बदलली. पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थींना शिर्डीत खास बस पाठवून आणण्यात आलं. त्यांच्यावर एवढा खर्च करण्यात आला. तरी मोदी यांचं भाषण सुरू असताना त्यातील बरेच जण उठून गेले, याचा अर्थ काय घ्यायचा ? पूर्वीच्या सरकारपेक्षा आपल्या सरकारची कामगिरी सरस कशी आहे, हे सांगण्याचा मोदी यांना जरूर अधिकार आहे ; परंतु ते करताना आकडेवारी तरी व्यवस्थित द्यायला हवी. त्यातही एखाद्या धार्मिकस्थळी आपण जेव्हा बोलतो, तेव्हा त्यात खोटारडेपणाच असू नये. संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारच्या काळात वाटप झालेल्या घरांची संख्या आणि मोदी यांच्या काळात वाटप झालेल्या घरांची संख्या याबाबत मोदी यांनी दिलेली आकडेवारीच आता वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात गरीब व मध्यमवर्गीयांसाठी केवळ 25 लाख घरं वाटप करण्यात आल्याचं मोदी यांनी सांगितलं होतं. या आकडेवारीलाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आक्षेप घेतला. 25 लाख घरं नव्हे, तर तब्बल दोन कोटी 24 लाख 37 हजार घरं बांधण्यात आली, असं प्रत्युत्तर चव्हाण यांनी मोदी यांना दिलं. शिर्डी येथील कार्यक्रमात गृहनिर्माण योजनांबाबत पंतप्रधान जनतेची दिशाभूल करणारी माहिती देतात, याचं दु:ख होतं, असं चव्हाण म्हणाले. यूपीए सरकारने चार वर्षांच्या काळात 25 लाख घरं बांधली आणि तेवढयाच कालावधीत एनडीए सरकारनं 1 कोटी 25 लाख घरं बांधल्याचा खोटा दावा करून पंतप्रधानांनी लोकांची दिशाभूल केली आहे, असा टोला त्यांनी लगावला. 2004 ते 2013 या यूपीए सरकारच्या कालावधीत इंदिरा आवास योजनेंतर्गत 2 कोटी 24 लाख 37 हजार घरं बांधली. म्हणजेच यूपीए सरकारच्या काळात प्रतिवर्ष 25 लाख घरं बांधून पूर्ण केली. मोदी सरकारला पंतप्रधान आवास योजनेचं उद्दिष्ट अद्याप पूर्ण करता आलं नाही. हे त्यांच्या सरकारनं दिलेल्या आकडेवारीवरूनच सिद्ध झालं आहे, असं चव्हाण यांनी सांगितलं.

शिर्डीसारख्या पवित्र ठिकाणी येऊन पंतप्रधान खोटं बोलण्याचं दु:साहस करत आहेत. आता साईबाबांनीच पंतप्रधानांना खरं बोलण्याची सद्बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना आपण साईबाबांना करणार असल्याचा टोला चव्हाण यांनी लगावला. शिर्डी दौर्‍यात मोदी यांनी नंदुरबारचा चहावाला, सातार्‍याचे आपले गुरू लक्ष्मणराव इनामदार आणि सोलापूरचे हातमागावर विणलेलं जॅकेट, असा गौरवपूर्ण उल्लेख केला. मात्र, सोलापूरबाबत पंतप्रधानांनी केलेल्या उल्लेखानं सोलापूरकर आश्‍चर्यचकित झाले आहेत. कारण सोलापूरमध्ये जॅकेटची निर्मिती कधीच केली जात नाही. त्यामुळं मोदी यांचं इथंही हसूच झालं आहे. सोलापूरच्या चादरी आणि टॉवेल प्रसिद्ध आहेत. चादरी आणि टॉवेल उत्पादनाशिवाय अलिकडं तयार कपडयांच्या उत्पादनाच्या क्षेत्रातही हळुहळू सोलापूरचं नाव घेतलं जाऊ लागलं आहे. याव्यतिरिक्त येथे थोडयाफार प्रमाणात बेडशिटचं उत्पादन केलं जातं. हातमागावर विणलं जाणारं जॅकेट सोलापुरात अजिबात तयार होत नाही. जॅकेट उत्पादन आणि सोलापूर यांचा अजिबात संबंध नाही. त्यामुळं जॅकेट उत्पादनात कधीच सोलापूरची ओळख नव्हती. ही वस्तुस्थिती लक्षात घेता मोदी यांनी स्वत: सोलापूरच्या हातमागावर विणलेल्या जॅकेटचा आवर्जून उल्लेख करावा, हे खरोखरच आश्‍चर्यकारक आणि धक्कादायक आहे. पंतप्रधानांना चुकीची माहिती पुरविण्यात आली आणि त्यांनी तिचा बिनदिक्कत वापर केला. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी मोदी हे सोलापुरात आले असता प्रचारसभेत तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा समाचार घेताना केलेलं एक विधान असंच धक्कादायक ठरलं होतं. गृहमंत्री म्हणून सुशीलकुमारांनी मनावर घेतलं असतं, तर याच सोलापुरात तयार होणार्‍या कापडाचा वापर देशातील पोलीस जवानांच्या गणवेशासाठी सहज करता आला असता. त्यातून सोलापूरचा वस्त्रोद्योग भरभराटीला आला असता, अशा आशयाचं विधान मोदींनी जाहीर सभेत केलं होतं. त्याचा मोठा फटका सुशीलकुमारांना बसला होता ; परंतु त्या वेळी मोदींनी देशातील सर्व पोलीस, जवानांच्या गणवेशासाठी सोलापूरच्या कापडाविषयी केलेलं विधानसुद्धा सपशेल चुकीच्या आधारावर होतं. कारण सोलापुरातील कापड गिरण्या 30 वर्षांपूर्वीच बंद पडल्या होत्या. अशी निखालस खोटी विधानं करून बुद्धिभेद करणार्‍या मोदी यांच्यावर नामुष्कीचा प्रसंग येऊ शकतो. त्याचं भान त्यांनीच ठेवायला हवं.