ऊसतोड मजुराचा संशयास्पद मृत्यू ; मृतदेह ठाण्यात आणला


नातेवाईक आक्रमक; मुकादमाने घातपात केल्याचा संशय; तात्काळ खुनाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी

बीड, (प्रतिनिधी):- ऊसतोड मजुराचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी मृतदेह थेट बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात आणून मुकादमाने घातपात केल्याचा संशय व्यक्त केला. खूनाचा गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह घेऊन जाणार नाही असा पावित्रा नातेवाईकांनी घेतला होता. मात्र पोलिसांनी त्यांची समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असुन त्याचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.

याबाबत नातेवाईकांनी सांगितलेली माहिती अशी की, बीड तालुक्यातील किन्हीपाई येथील रमेश रामभाऊ कानडे (वय ४२) हे दि.१० ऑक्टोबर रोजी घरामध्ये जेवण करत असतांना त्याठिकाणी आलेले मुकादम यांनी त्यांना ऊसतोडीला जायचे आहे म्हणून सोबत नेले. काल सकाळी जालिंदर साधू कानडे आणि बापू धुताडमल हे दोघे रमेश कानडे यांचा मृतदेह रुग्णवाहिकेमधुन किन्हीपाई येथे घेऊन आले. त्यांच्याकडे विचारणा केली असता रमेश यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्याकडून मिळाली. त्यावर नातेवाईकांनी संशय घेत मृत्यू झाल्यानंतर आम्हाला का कळवले नाही? परस्पर शवविच्छेदन का केले? असे प्रश्‍न उपस्थित केले. र्‍हदय बंद झाल्याने त्यांचा इंदापुरमध्ये मृत्यू झाल्याचे उत्तर त्यांच्याकडून मिळाले. मात्र सदरील प्रकाराविषयी संशय व्यक्त करत नातेवाईकांनी रुग्णवाहिकेसह मृतदेह घेऊन थेट बीड ग्रामीण पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणात घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत मुकादमाविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी मयताचा मुलगा महेश कानडे, मुलगी डमा कानडे यांनी केली आहे. सदरील घटनेची माहिती कळताच डिपीआयचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी सहकार्‍यांसह पोलिस ठाण्यात येऊन झालेल्या प्रकाराची माहिती घेतली. मयत रमेश कानडे यांचा मृत्यू संशयास्पद असुन संबंधित मुकादमाविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी अजिंक्य चांदणे यांनी केली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget