Breaking News

माजी आ. विठ्ठलराव भैलुमे यांचे निधन


कर्जत प्रतिनिधी :

कर्जत-जामखेड़चे काँग्रेसचे माजी आ. विठ्ठलराव भैलुमे (अण्णा) यांचे आज दि. १० पहाटे ३ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने कर्जतच्या स्थानिक राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली.

कै. भैलुमे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण करत महात्मा गांधी विद्यालयात वस्तीगृह अधिक्षक आणि पुढे शिक्षक म्हणून कार्यरत होते. १९७० साली त्यांनी स्थानिक राजकारणात प्रवेश करत मागासवर्गीय फॉर्मिंग सोसायटीचे ते अध्यक्ष झाले. सन १९९० ते १९९५ कै. भैलुमे यांनी सिनापुत्र कै. आबासाहेब निंबाळकर यांच्या सहकार्याने काँग्रेसच्या तिकिटावर कर्जतचे प्रथम स्थानिक आमदार होण्याचा मान मिळविला होता. आमदारकीच्या काळात त्यांनी कर्जत-जामखेडच्या विकासासाठी भरीव कामे केली. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जात असत. 

दरम्यान, माजी आ. कै. विठ्ठलराव भैलुमे यांच्या पार्थिवावर त्यांच्या शेतावरच अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, माजी जि. प. सदस्य अंबादास पिसाळ, भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, राष्ट्रवादीचे नेते मधुकर राळेभात कोरेगांवचे माजी सरपंच शिवाजी फाळके, नगरसेवक सचिन घुले, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, स्वप्नील देसाई, सरपंच काका धांडे, नगरसेवक बापूसाहेब नेटके, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्ष मनिषा वडे, मल्हारराव घोडके आदींसह शिक्षक, वकिल, पत्रकार, डॉक्टर आणि विविध संस्थाचे पदााधिकारी, नगरसेवक व नगरसेविका, विविध गावचे सरपंच उपस्थित होते.