Breaking News

मराठा विद्यार्थी वस्तीगृह अर्पण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ना. चंद्रकांत पाटील, ना.गिरीश महाजन, विनायक मेटेंच्या हस्ते मेरीत आज अर्पण सोहळा

नाशिक/प्रतिनिधी : सन 1980 पासून मराठा समाजाचा सुरू असलेला संघर्ष, गेल्या दोन अडीच वर्षात शांततेच्या मार्गाने सुरू असलेले समाजाचे आंदोलन, मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून निघालेले लाखो जनसमुदायाचे 57 अभूतपुर्व मोर्च्यांनी ज्यासाठी हा सारा अट्टाहास केला होता तो पुर्णत्वास जाण्याचे मार्ग खुले होत असून त्याचाच एक भाग म्हणून मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय विद्यार्थी वस्तीगृह रविवार दि.14 आक्टोबर रोजी विद्यार्थांना अर्पण केले जात आहे. हा एका वेगळ्या अर्थाने समाजासाठी ऐतिहासिक ठरणारा हा क्षण अनुभवण्यासाठी जिल्ह्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने मेरी येथे सकाळी 10 वा.उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा क्रांती मोर्चाने केले आहे. यासंदर्भात अधिक माहीती अशी की, मराठा समाज कोपर्डीच्या त्या दुर्दैवी घटनेनंतर एकञ आला आणि भुतकाळातील पुढारले पणाच्या शापाचे चटके विद्यमान पिढीला बसत असलेली जाणीव सार्वजनिक झाली.संघटीत झालेला हा पुढार शापीत समाज अन्यायाविरूध्द संघर्ष करण्याच्या तयारीने रस्त्यावर उतरला. आणि कुठल्याही राजकीय पक्षाच्या झेंड्या अन् नेत्याशिवाय तरूण मराठा समाजाने क्रांती मोर्चाची निर्मिती केली.मराठा समाजाचे संघटन प्रक्रीया सुरू आसतांना आरक्षणाच्या लढाईने आजपर्यंत घेतलेल्या प्रत्येक वळणाचे स्मरण होत राहीले.स्व.आण्णासाहेब पाटील,स्व.आण्णासाहेब जावळे पाटील यांचे मराठा समाजासाठीचे बलिदान व्यर्थ जाऊ द्यायचे नाही,हा निर्धार करूनच मराठा क्रांती मोर्चाची निर्मिती झाली आणि गर्दी,शांतता,स्वच्छता आणि द्वेष न करण्याचे सारे विक्रम मोडीत काढण्याचे सर्वोच्च नियोजन मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जगाने अनुभवले.
अथक संघर्षाची फलश्रूती म्हणून शासनकर्त्यांनी मराठा समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरूवात केली.समाज मुळतः राजकारणी जमात म्हणून गौरवला,हिनवला जात असला तरी मराठा क्रांती मोर्चा पुर्णतः राजकारण विरहीत राखण्याचे नियोजन यशाचे गमक ठरले.परिणाम स्वरूप महाराष्ट्र शासनाला समाजाच्या मागण्यांची दखल घेणे क्रमप्राप्त ठरले.
विद्यार्थ्यांना पन्नास टक्के फी सवलत,बार्टीच्या धरतीवर सारथीची स्थापना, बिनव्याजी दहा लाखापर्यंत व्यवसाय उद्योग कर्ज देण्यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे पुनरूज्जीवन, जिल्हास्तरीय डॉ. पंजाबराव देशमुख विद्यार्थी वस्तीगृह बांधणे, बाहेरगावी शिक्षण घेणारे पण वस्तीगृहात प्रवेश न मिळू शकलेल्या विद्यार्थांना वार्षिक 10 हजार निवासभत्ता अशा विविध योजना मराठा क्रांती मोर्चाच्या सामंजस्याची मिळकत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या या लढाईतून नाशिक जिल्ह्यासाठी मंजूर झालेले पहिले वस्तीगृह मराठा विद्यार्थांना अर्पण करण्याचा सोहळा रविवार दि.14 आक्टोबर 2018 रोजी सकाळी 10 वा. मेरीच्या प्रांगणात संपन्न होत आहे.यावेळी महाराष्ट्राचे महसूल तथा सार्वजनिक बांधकाम मंञी, मराठा आरक्षण मंञीस्तरीय उपसमितीचे सदस्य ना. चंद्रकात दादा पाटील,जलसंधारण तथा पालकमंञी ना.गिरीश महाजन आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तब्बल 40 वर्षाच्या अथक संघर्षानंतर मराठा समाजाच्या पदरात योग्य दान पडत असल्यामुळे हा क्षण समाजासाठी ऐतिहासीक असून त्याचे साक्षीदार होण्यासाठी जिल्ह्यातील समाज बांधवांनी अधिकाअधिक संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांसह छावा क्रांती वीर सेना,अ.भा. युवक मराठा महासंघ, शिवसंग्राम संघटना, अ. भा. छावा संघटना, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, स्वाभीमानी संभाजी ब्रिगेड, छञपती युवा सेना, मावळा संगटना, जिजाऊ ब्रिगेड, अ. भा. विदयार्थी परिषदेत अशा विविध मराठा संघटनांनी केले आहे.