Breaking News

नव्या गृहनिर्माण विकास महामंडळाची होणार स्थापना; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय


मुंबई : मोठ्या वसाहतींचे प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ स्थापण करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर मुंबई शहरात सीसीटीव्ही प्रकल्प व्यापक करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत देशभरात सध्या मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प राबवली जात आहेत. इच्छुकांना या योजनेमधून घरे मिळावीत हाच या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. राज्यात देखील सिडको आणि म्हाडा या सरकारच्या आधीन राहून काम करणार्‍या महामंडळांनी मोठे गृहप्रकल्प हाती घेतले आहेत. 

यामध्ये देखील प्रधानमंत्री अवास योजनेतून घरे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. त्यातच असे मोठे प्रकल्प उभारण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये आता महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ स्थापण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयाबरोबर आणखी 4 महत्त्वाचे निर्णय या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले असून, पुण्यात वन्यप्राण्यांसाठी उपचार केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील निवडक जिल्ह्यांमध्ये मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करुन देण्याच्या पथदर्शी योजनेस मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबई शहरात सीसीटीव्हीचे जाळे व्यापक बनविण्यासाठी भर देण्यावरही मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.