Breaking News

मुद्रा लोन न मिळाल्याने युवकाची आत्महत्या; मृतदेह तहसीलमध्ये आठ तास पडून प्रशासनाच्या अनास्थेचा ठरला बळी


बुलडाणा,(प्रतिनिधी): दोन वर्षे उलटल्यानंतरही महाराष्ट्र बँकेने मुद्रा लोन दिले नाही. बँक व्यवस्थापकांनी वारंवार बँकेतून हाकलून लावले. त्यामुळे निराश झालेल्या पळशी झाशी येथील 24 वर्षीय उच्च शिक्षित युवकाने 22 ऑक्टोबर रोजी गळफास घेवून आत्महत्या केली. मृत्युपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती. दोन वर्षापासून मुद्रा लोणसाठी बँकेत प्रस्ताव दाखल करूनही कर्ज मिळत नसल्याने त्याने हे टोकाचे पाउल उचलल्याचे चिठ्ठीत नमुद केल्याने सर्वत्र खळबळ उडाली.

प्रशासनाच्या अनास्थेचा हा युवक बळी ठरला आहे. पळशी झाशी येथील सागर दिनकर वाघ याचे शिक्षण एम.कॉम. पर्यंत झालेले आहे. दोन वर्षा पूर्वी त्याने व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्र बँकेत मुद्रा लोनसाठी अर्ज केला होता. कर्जासाठी लागणारे निकष सुद्धा पूर्ण केले. परंतु त्याचे कर्ज प्रकरण मंजूर न करता बँक व्यवस्थापक अरुण तांदळे हे त्याला हाकलून लावत होते. दरम्यान, 22 ऑक्टोंबर रोजी सकाळी सागरने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये प्रधान मंत्री आवास योजनेसाठी सर्व निकष पूर्ण करूनही या योजनेपासून मला वंचित ठेवण्यात आले. स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी कर्ज दिले नाही. त्यामुळे ही माझी आत्महत्या नसून सिस्टमने केलेली हत्या आहे. तसेच जोपर्यंत परिवाराला कमीत कमी पाच लाख रुपये मदत मिळत नाही, तोपर्यंत माझा मृतदेह जागेवरून उचलू नये, असे चिठ्ठीत नमूद केले आहे. त्यामुळे वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन झाल्यानंतर नातेवाइकासह ग्रामस्थांनी त्याचा मृतदेह तहसील कार्यालयात आणला. मृतक सागर वाघ याच्या कुटुंबाला तत्काळ मदत जाहीर करून बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक तांदळे यांच्या विरुद्ध मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. दरम्यान भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षाने ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु संतप्त ग्रामस्थांनी त्याला चोप देवून हाकलून लावले. शेवटी उपविभागीय अधिकार्‍यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर बँक व्यवस्थापक तांदळे यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन दिले. परंतु पाच लाखाची मदत मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. त्यामुळे स्वत: भाजपचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी स्वतःजवळील 5 लाख रुपये वाघ कुटुंबीयांना दिल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला.