Breaking News

ग्रामसेवकांचे अनुभवसंपन्न लेखन मराठी साहित्य समृद्ध करणारे ठरेल


नगर । प्रतिनिधी -
महान परंपरा असलेल्या मराठी साहित्यातून वंचिताचा आवाज सर्वांपर्यंत पोहचण्याचे कामसातत्याने झालेले आहे. शासकीय सेवेतील ग्रामसेवक हा ग्रामीण भागात कार्य करणारा अनुभवसंपन्न घटक आहे. त्यांचे अनुभव साहित्यातून बाहेर आले तर मराठी साहित्य समृध्द होईल. शेतकरी, तळागाळातील लोकांचे दु:ख, वेदना त्यांच्या साहित्यातून समोर येवू शकते. यासाठी एकनाथ ढाकणे व त्यांचे सहकारी राबवित असलेले उपक्रमअतिशय लाखमोलाचे आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी साहित्यिक लहू कानडे यांनी केले.

ग्रामसेवकांच्या ग्रामसेवा संदेश मासिकाच्या वर्धापनदिनानिमित्त ग्रामसेवक युनियनच्यावतीने नगरमध्ये महाराष्ट्रातील साहित्यिकांचा गौरव व कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कानडे बोलत होते.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे, सुनील गोसावी, अंकुश शिंगाडे, विलास काकडे, अशोक नरसाळे, राजेंद्र फंड, युवराज पाटील, आसारामकपिले, तानाजी पानसरे, भैय्यासाहेब कोठुळे, संपत गोल्हार, शहाजी नरसाळे, मंगेश पुंड, शिवाजी पालवे, श्रीकांत जर्हाड, बाळासाहेब आमरे, राजेंद्र पावसे, नफीसखान पठाण, श्रीकांत कल्याणकर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते साहित्यक, कवींचा मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. ग्रामसेवा संदेशचे संपादक एकनाथ ढाकणे यांचाही या साहित्यसेवेसाठी विशेष सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.एकनाथ ढाकणे यांनी ग्रामविकास करतानाच साहित्यिक प्रांतातील मुशाफिरी ग्रामसेवकांसाठी ऊर्जादायी असल्याचे सांगितले.

‘तुझ्या हाताचा स्पर्श मला तो हळूवार पाहिजे, गाणे असे असावे की थोडा गुलजार पाहिजे’ , ‘दहा जणांनी आवाज उठवला तर लोक त्याला गोंधळ म्हणतात, राज्यातील 22 हजार ग्रामसेवकांनी आवाज उठवला तर त्याला ग्रामविकासाची क्रांती म्हणतात’ अशा एकाहून एक सरस आशयसंपन्न कवितांनी या कवी संमेलनात बहार आणली.