बळी गेल्यानंतरच ‘साबां’ला जाग येणार का ? संतप्त ग्रामस्थांचा सवाल


शेवगाव प्रतिनिधी

शेवगाव-नेवासा राज्यमार्ग क्रमांक ४४ वर असलेल्या जोहरापूरजवळील ढोरा नदीपुलाचे कठडे गेल्या अनेक दिवसांपासून तुटले आहे. त्यामुळे या परिसरात अपघात होऊन जीवित वित्तीय हानीची संभाव्य घटना घडू शकते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र याकडे अजिबात लक्ष नाही. या भागात एखाद्याचा बळी गेल्यानंतरच या विभागाला जाग येणार का, अशी विचारणा संतप्त ग्रामस्थांमधून केली जात आहे. 

शेवगाववरून श्रीरामपूर, कोपरगाव, नाशिक, धुळे, जळगाव शहरांना जोडण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. परंतु या रस्त्यावर दिवसेंदिवस वाढत चाललेली वर्दळ आणि त्यातच फुलाचे तुटलेले कठडे यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. या पुलावरून लहान मुलांची स्कूल बस तसेच मिनी स्कुल बस या वाहनांसह अन्य अनेक प्रकारच्या वाहनांची वर्दळ कायम असते. शाळेत सायकल वरून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही या रस्त्यावर खूप आहे. गणपती विसर्जनात या फुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने ढुंकूनही पाहिले नाही. ढोरा नदीवरील पुलाबरोबरच या शेवगाव-नेवासा राज्यमार्गावरील खड्डे हे सुद्धा चिंतेची बाब ठरत आहेत. या रस्त्याकडे पाहायला सार्वजनिक बांधकाम विभागाला अजिबात वेळ नसल्याचे दिसत आहे. एकंदरीतच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी, सुपरवायझर, मैल बिगारी नेमकं करतात काय, हा मोठा संशोधनाचा विषय बनला आहे. 

मध्यंतरी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे तालुक्यात दौरा असताना अक्षरशः मातीने बुजलेले खड्डे जनतेने पाहिलेले आहेत. त्यामुळे जनतेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाविषयी मोठ्या प्रमाणात नाराजी पसरलेली आहे. या पुलाचे तुटलेले कठडे, दिशादर्शक फलक, पुलाची रंगरंगोटी आदी बाबी लवकरात लवकर सुव्यवस्थित कराव्यात, अशी मागणी आता जनतेतून होत आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget