Breaking News

नगर परिषदेने केलेल्या जखमा आजही कायम; १४ कुटूंबांना न्यायाची प्रतिक्षा; लक्ष्मणनगर भागातील रहिवाश्यांच्या डोळ्यात अर्श्रुे्रं


बीड, (प्रतिनिधी):- शहरातील लक्ष्मण नगर भागातील १४ घरे पाडल्याच्या कारवाईला वर्ष होत आहे. संबंधित कुटूंबांनी या प्रकरणात न्यायालयात धाव घेतलेली असली तरी जिल्हाधिकार्‍यांकडूनही त्यांना न्यायाची प्रतिक्षा आहे. विशेष म्हणजे भुमिअभिलेखकडे कारवाई संदर्भात कसल्याही प्रकारची टिप्पणी नसतांनाही नगरपालिकेने या १४ कुटूंबांच्या घरावर जेसीबी फिरवला आहे. त्यांच्या पुनर्वसनाबाबतही कसलीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. आजही ती १४ कुटूंब किरायाने या दारातून त्या दारात फिरत आहेत. तरीही पालिका आणि जिल्हा प्रशासनाला त्यांचे आश्रू दिसत नाहीत हेच दुर्दैव म्हणावे लागेल.

बीड नगरपालिके वर्षभरापुर्वी लक्ष्मणनगर भागातील १४ घरे पाडली. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी केल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले असले तरी गेल्या अनेक वर्षांपासुन त्याच जागेवर राहणार्‍या आणि त्या बदल्यात नगरपालिकेला घरपट्टी, नळपट्टी भरणार्‍या लोकांचा पालिकेने कसलाही विचार केला नाही हे विशेष. एक वर्षापुर्वी १४ कुटूंबांना बेघर करणार्‍या पालिकेने त्यांच्या पुनर्वसनासाठी कोणतीच ठोस कार्यवाही केलेली नाही. यासंदर्भात त्या लोकांनी नगरपालिका आणि जिल्हाधिकार्‍यांकडे दाद मागितली तरीही कोणीच दखल घेत नसल्याने आजही त्या कुटूंबांवर हक्काची जागा असतांनाही इतरांच्या दारात जाऊन राहण्याची वेळ आली आहे. या प्रकरणात संबंधित कुटूंबांनी न्यायालयात धाव घेतलेली असुन न्यायदेवतेवर त्यांचा विश्‍वास आहे. असे असले तरी पालिकेने किंवा जिल्हाधिकार्‍यांनी याप्रश्‍नी लक्ष घालून कुटूंबांच्या पुनर्वसनासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे अशी अपेक्षा त्या कुटूंबांकडून व्यक्त होत आहे.