Breaking News

शाहूपुरी पोलीस ठाण्याची वाहतूक शाखा बरखास्त


सातारा (प्रतिनिधी) : शाहूपुरी पोलीस ठाण्याअंतर्गत चाललेली स्वतंत्र वाहतूक शाखा जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांनी बरखास्त केली आहे. या शाखेत कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना आपल्या मूळ ठिकाणी कार्यरत होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शहर पोलीस ठाण्याअंतर्गत शहर वाहतूक शाखा अधिकृतरीत्या कार्यरत होती. संपूर्ण शहरातील वाहतुकीच्या नियोजनाचे काम ही शाखा करत होती. शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता शाहूपुरी पोलीस ठाण्याची नव्याने निर्मिती करण्यात आली. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दी शाहूपुरी पोलीस ठाण्यात विभागण्यात आल्या. त्यानुसार सातारा शहरामध्ये दोन पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून त्या-त्या विभागातील कायदा व सुव्यवस्थेचे नियोजन होत आहे. 

शाहूपुरी पोलीस ठाणे अस्तित्वात आल्यानंतर स्वतंत्र अशी शाहूपुरी वाहतूक शाखाही तयार करण्यात आली. मात्र तिला अधिकृत अशी परवानगी नव्हती, तरीही या शाखेमध्ये मुख्यालय, शहर पोलीस ठाणे, शाहूपुरी पोलीस ठाणे व विविध ठिकाणचे 40 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्यांच्या मार्फत शाहूपुरी हद्दीतील वाहतुकीचे नियोजन केले जात होते, तसेच या शाखेच्या माध्यमातून ‘नो पार्किंग’ मध्ये लावलेल्या गाड्या उचलण्याचे कामही केले जात होते. जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांनी जिल्हा पोलीस दलाचा आढावा घेतला. त्यामध्ये या शाखेला अधिकृत मान्यता नसल्याचे समोर आले. त्यामुळे शाहूपुरीची वाहतूक शाखा बरखास्त करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शाखेत कार्यरत असलेले कर्मचारी ज्या ठिकाणाहून आले आहेत, त्यांनी त्याठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले.