Breaking News

भूजल कायद्यातील नियम त्रासदायक : कातोरे


शिर्डी / प्रतिनिधी 

महाराष्ट्र शासन भूजल कायदा लागू करण्याच्या तयारीत असून त्यातील असलेल्या जाचक अटी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या ठरत आहे. त्यासाठी आता जनजागृतीच्या माध्यमातून विरोध करण्यासाठी शेतकऱ्यानी पुढे आले पाहिजे, असे मत राहाता पंचायत समितीच्या सभापती हिरा कातोरे यांनी व्यक्त केले आहे. 

त्या म्हणाल्या, की गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी होत आहे. त्यातच अनेक नदी पात्रातून बेसुमार होणारा वाळूचा उपसा, जमीनीची खोल गेलेली पाण्याची पातळी नगर व नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीला सोडलेले पाणी यामुळे रोटेशनवर परिणाम झाला आहे. मात्र असे असतांना जर सरकार शेतकऱ्यांना अडचणी आणणारे धोरण राबवत असेल तर हा मोठा अन्याय ठरणार आहे. आपल्याच मालकीच्या शेतात ६० फुटापेक्षा जास्त खोल विहीर घेण्यासाठी व बोअर घेतांना २०० फुटापेक्षा जास्त बोअर घ्यायचा असेल तर यासाठी शासनाची परवानगी लागणार आहे. यामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. यावेळी सरपंच शिल्पा कातोरे, उपसरपंच अजय जगताप, बाजार समितीचे संचालक शरद मते, बाळासाहेब जपे, निघोजचे सरपंच गणेश कनगरे, माजी उपसरपंच विजय कातोरे, शेतकरी कैलास गाडेकर, राजेंद्र गाडेकर, संजय मते, मनोज वदक, नारायण गाडेकर आदी उपस्थित होते.