Breaking News

ठेका रद्द करण्याच्या कारणावरुन वाईच्या नगरपालिकेच्या विशेष सभेत गदारोळ


वाई (प्रतिनिधी) : वाई शहरातील ओला, सुका व प्लास्टिक कचरा वर्गीकरण करून तो कचरा डेपोपर्यंत टाकण्यासाठी नगरपालिकेने नेमलेला ठेकेदार समाधानकारक काम करत नसल्याने त्याचा ठेका रद्द करण्याच्या कारणास्तव वाई नगरपालिकेच्यावतीने विशेष सभा बोलावण्यात आली होती. यावेळी चांगलच खडाजंगी झाली. तत्पूर्वी आ. मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून मिळालेला कोट्यावधींचा अखर्चित निधी माघारी गेल्याच्या कारणावरून नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांनी दिलेला खुलासा समाधानकारक नसून तो खोटा व वाईकर नागरिकांची दिशाभूल करणारा आहे असा स्पष्ट आरोप उपनगराध्यक्ष अनिल सावंत, चरण गायकवाड, दीपक ओसवाल यांनी केला. 

यावेळी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक दिपक ओसवाल यांना सभागृहात बोलण्यास नगराध्यक्षांनी मज्जाव करण्याचा प्रयत्न केला असता सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. परंतु या विशेष सभेस मुख्याधिकारी विद्या पोळ व अधिकारी गैरहजर राहिल्याने नगरसेवकांना अपेक्षित उत्तरे न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली.
वाई नगरपालिकेने ओला, सुका व प्लास्टिक कचरा वर्गीकरण करून एमआयडीसी येथील कचरा डेपोमध्ये टाकण्यासाठी मे. अथर्व इंटरप्रायझेस वाई यांना ठेका दिला होता. परंतु ठेकेदार ओला, सुका व प्लास्टिक कचरा वर्गीकरण करण्यास टाळाटाळ करत असून शहरातील टक्के कचरा नगरपालिकेच्या कचरा गाडी मार्फत उचलला जात असल्याने प्रशासनाकडून ठेकेदारांवर कोणतीही कारवाई का होत नाही? कि प्रशासन ठेकेदारांना पाठीशी घालत आहे? असा संतप्त सवाल अनिल सावंत यांनी सभागृहात उपस्थित केला. ठेकेदारांकडून काम समाधानकारक नसताना देखील एकच ठेकेदार पालिकेला वेठीस धरत आहे. तरी संबधित ठेकेदारावर पालिकेने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक चरण गायकवाड यांनी केली. सर्वच नगरसेवकांनी संतप्त भूमिका घेत संबधित ठेका रद्द करून नवीन ठेकेदाराची नियुक्ती करावी अशी मागणी केली व ती बहुमताने मंजूर करण्यात आली. या विषयाला अनुसरून नगरसेवक महेंद्र धनवे यांनी दुजोरा देत यासंदर्भात पुढे येणार्‍या अडचणींना सर्वस्वी प्रशासन व अधिकारी जबाबदार राहतील अशी भूमिका मांडली. नगरपालिकेच्या आर्थिक बजेटमध्ये सानुग्रह अनुदानासंदर्भात कोणतीही तडजोड नसल्याने प्रशासकीय कर्मचार्‍यांना सानुग्रह अनुदान देता येत नसल्याचे स्पष्टीकरण सभागृहाने दिले. महिलांना उधोग व्यवसाय करता यावा याकरिता प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यासाठी खर्चास मंजुरी सभागृहाकडून मंजुरी देण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते सतीश वैराट, नगरसेवक महेंद्र धनवे, राजेश गुरव, भारत खामकर, संग्राम पवार, प्रदीप चोरगे, विकास काटेकर, किशोर बागुल, नगरसेविका रेश्मा जायगुडे, ररुपाली वनारसे, आरती कांबळे, वासंती ढेकाणे, सुनीता चक्के, शितल शिंदे, स्मिता हगीर, आदींनी सहभाग घेतला.