Breaking News

मेळघाट शिवसेना संपर्क प्रमुखपदी नरेश माळवे


।संगमनेर/प्रतिनिधी।

शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारणात गेली अनेक वर्ष कार्यरत असलेल्या नरेश माळवे यांची मेळघाटचे (जि. अमरावती) संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व विदर्भनेते गजानन किर्तीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील प्रलंबित असलेल्या संपर्क प्रमुखांची नियुक्ति करण्यात आली. त्यात माळवे यांची वर्णी लागल्याने सच्च्या कार्यकर्त्याला न्याय मिळतोच, अशी भावना व्यक्त करत मावळे यांच्या समर्थकांनी संगमनेरात जल्लोश केला.

सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या धोरणानुसार ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रानुसार तेथील आदिवासी बांधवांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी काम करणार असल्याचे नवनियुक्त संपर्कप्रमुख माळवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. अमरावती जिल्ह्यात शिवसेनेचे मोठे प्राबल्य आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, खा. आनंदराव अडसूळ तेथील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मेळघाटचा दौरा करुन तेथील नागरिकांच्या समस्या व अडचणी जाणून त्या पक्षप्रमुखांपर्यंत पोहाचविण्याचा प्रयत्न राहील. सोबतच अमरावतीच्या ग्रामीण भागात मोडणार्‍या मेळघाट परिसरात शिवसेनेची मजबूत संघटनात्मक बांधणी करण्यासाठी आपण प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. नरेश माळवे हे संगमनेरचे रहिवासी आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरीत होऊन सामान्य शिवसैनिक म्हणून गेली दोन दशके ते काम करत आहेत. सेनेचे विदर्भ विभागाचे समन्वयक अरविंद नेरकर यांनी मेळघाटच्या संपर्क प्रमुख म्हणून नियुक्तिचे पत्र त्यांना नुकतेच सुपूर्द केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याला मान्यता दिल्याने एका सच्च्या शिवसैनिकाला न्याय मिळाला, अशी भावना माळवे यांच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे.

माळवे यांच्या निवडीचे उत्तर नगरचे संपर्क प्रमुख आ. सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, महिला आघाडी संपर्क प्रमुख शुभांगी नांदगावकर, ज्येष्ठ शिवसैनिक अप्पासाहेब केसेकर, रावसाहेब गुंजाळ, कामगार सेना जिल्हाप्रमुख मुजिब शेख, संगमनेर विधानसभा संपर्क प्रमुख मोहन वाघमारे, अकोले विधानसभा संपर्क प्रमुख सूर्यकांत शिंदे, साकोली विधानसभा संपर्कप्रमुख मनोज कपोते, संगमनेर तालूका प्रमुख जनार्दन आहेर, शहर प्रमुख अमर कतारी, अशोक सातपुते आदींसह शिवसैनिकांनी त्यांचे अभिनंदन केले.