Breaking News

ऑटोसह एक लाखांची देशी दारू जप्त


राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची राष्ट्रीय महामार्गावर कारवाई, दोन आरोपींना अटक बुलडाणा,(प्रतिनिधी): अवैधरीत्या ऑटोने देशी दारूची वाहतूक करणार्‍या दोन जणांना राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने पकडले. या वेळी त्यांच्या ताब्यातून ऑटोसह 1 लाख 480 रुपयांचा माल जप्त केला. ही धडक कारवाई 20 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील हॉटेल अशोक समोर केली. 

21 ऑक्टोबर रोजी खामगाव येथे दुर्गा देवी विसर्जन असल्याने शहरातील देशी व विदेशी दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. दरम्यान आज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून एका ऑटोत अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक सुरेश चव्हाण यांना मिळाली. यावरून त्यांच्यासह पथकातील कर्मचार्‍यांनी हॉटेल अशोकसमोर सापळा रचला. या वेळी पथकातील कर्मचार्‍यांनी खामगाव ते चिखली महामार्गावरील चौफुलीवर एमएच 28 सी 8412 या क्रमांकाच्या ऑटोची झडती घेतली असता, त्यामध्ये देशी दारूच्या 480 बाटल्या आढळून आल्या. त्यानंतर कर्मचार्‍यांनी ऑटोसह 1 लाख 480 रुपये किमतीची दारू जप्त करून आरोपी विष्णू दांडगे रा. गोंधनापूर व मो. इरफान अ. रज्जाक रा. सज्जनपुरी खामगाव यांना अटक केली. ही कारवाई अधीक्षक एस. एल. कदम यांच्या मार्गदर्शनात केली आहे.