Breaking News

माजलगाव तालुका दुष्काळ जाहीर करा-बळीराम ढगे


माजलगाव (प्रतिनिधी)- माजलगाव तालुक्यात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, मुग, तुर, बाजरी यासह अनेक प्रमुख पिकांच्या उत्पादनात झालेला खर्चही फिरणार नसल्याने तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. त्याच प्रमाणे पिण्याचे पाणी, गुरांचा चारा, बेरोजगारी असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वरूण राज्याने पाठ फिरवल्याने उत्पादनाला अपुर्‍या पावसाचा फटका बसला आहे. 

तरी तात्पुरत्या स्वरूपात शासनाने हेक्टरी ७५,०००/- रूपये शासकीय मदत देण्यात यावी. शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्ज व वीजबिल माफ करण्यात यावे, उर्वरित राहिलेल्या गावातील बोंडआळीचे अनुदान तात्काळ वाटप करण्यात यावे व संपूर्ण माजलगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा. अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद माजलगावचे नेते बळीराम ढगे यांनी तहसीलदार झंपलवाड साहेब यांना निवेदनात केली आहे. यावेळी अशोक ढगे, संजय गनगे, सावता रासवे, विशाल जाधव, सिध्देश्वर रासवे, जगण खेञे यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.