Breaking News

शाळा-महाविद्यालयांतील ‘हातगाड्या’ विद्यार्थ्यांना देताहेत जुगाराचे ‘ट्रेनिंग’; शाळा-प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष


वरुर / प्रतिनिधी

शेवगाव शहरातील शाळांना हातगाडीचालकांचा जो गराडा पडला आहे, त्यामुळे शालेय विद्यार्थी व्यसनाधीन आणि जुगारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या हातगाडीचालकांकडे सोरट, मटका चिट्ठी हा प्रकार सर्रास सुरु आहे. यामुळे शालेय विद्यार्थी घरून खाऊसाठी पैसे आणून त्या पैशांची चिट्ठी फाडून पाहतात. फेल गेली, की परत परत तेच करून दहा-पाच रुपये खर्च करतात आणि नाराज होऊन निघून जातात. त्यामुळे यांना भविष्यात खूप मोठया जुगाराची सवय लागण्याची शक्यता आहे. शाळा प्रशासनाचे मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

शहरातील मिरी रोड भागात दोन मोठी हायस्कूल, सिनिअर कॉलेज आणि अनेक खासगी क्लासेस आहेत. रेसिडेन्सीयल हायस्कुल, आणि काकडे हायस्कुलसमोर काही हातगाड्या लागतात. या हातगाड्याचालक बरेचशे उघड्यावरील व अस्वछ अन्न पदार्थ, विकतात. यामुळे विद्यार्थांच्या आरोग्यास हानी होते. मुरमुरा भेळ त्यात चिंचेचं आंबट पाणी, पाणसामोसा, पॅटिस, फार दिवसाचे आंबट बोर, बाबू पोंगे आदी खाद्य पदार्थ उघड्यावरच विक्री करतात. शाळा भरण्यापूर्वी विदयार्थी लवकर येऊन या हातगाडीभोवती गर्दी करून त्या ठिकाणी टाइम पास करतात. ते जादा तास करत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होत आहे. या हातगाड्यांचा दुकानदार आणि स्थानिक लोकांना फार त्रास होत आहे. त्यामुळे शालेय व्यवस्थापनाने व नगरपरिषदेने याकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.