Breaking News

छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांविरोधात वाजपेयींची भाची रिंगणात


रायपूर : छत्तीसगड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली. यात मुख्यमंत्री डॉ.रमण सिंह यांच्याविरोधात काँग्रेसने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाची करूणा शुक्ला यांना रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे सिंह विरूद्द शुक्ला ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने यापूर्वीच 12 जागांची घोषणा केली आहे. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीत राजनांदगांवमधून करूणा शुक्ला यांना उमेदवारी जाहीर केली. 

वाजपेयींच्या भाचीलाच डॉ. रमण सिंह याच्या समोर उभे केल्याने ही निवडणूक सिंह यांच्यासाठी आव्हानात्मक असेल. शुक्लांसह खैरागडमधून गिरवर जंघेल, डोंगरगडमधून भुनेश्‍वर सिंह बघेस यांनाही पक्षाने उमेदवारी दिली आहे. 23 ऑक्टोबरला अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. करूणा शुक्ला या 14व्या लोकसभेच्या सदस्य होत्या. जंजगिर मतदारसंघातून त्या भाजपच्या तिकीटावरून निवडून गेल्या होत्या. मात्र, 2009 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपला टीकेचे लक्ष्य करत त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. 32 वर्षासोबत भाजपशी असलेले नाते संपवून त्या काँग्रेसवासी झाल्या. काँग्रेसने त्यांना 2014 लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली. मात्र, त्यांना पराभवला सामोरे जावे लागले.