Breaking News

पाचव्या दिवशीही महिलांना शबरीमलाची दारे बंदच


नवी दिल्ली : शबरीमला मंदिरात पाचव्या दिवशीही भाविकांची गर्दी आहे. मात्र, अद्यापही 10 ते 50 वयोगटातील महिलांना शबरीमलात प्रवेश करण्यास होणारा विरोध कायम आहे. आजही मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्‍या दोन महिलांना पोलीस नियंत्रण कक्षात आणण्यात आले. त्यांना इतर भाविकांनी मंदिरात जाण्यास विरोध केल्यानंतर पोलिसांना त्या महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल उचलावे लागले. पथिनेट्टम पडी येथून भाविकांनी शबरीमला मंदिराकडे जाण्यास प्रारंभ केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही महिलांना या मंदिरात जाण्यापासून रोखले जात आहे. हिंदू संघटनांच्या टोकाच्या हिंसक निषेधामुळे अद्यापही महिलांना या मंदिरात जाणे शक्य झालेले नाही. 17 ऑक्टोबरला दोन महिलांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा विरोध तीव्र झाला होता. याशिवाय, एका तरुण महिलेने शनिवारीही अय्यप्पा मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिलाही पोलिसांनी अडविले. तसेच, गोंधळ टाळण्यासाठी सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला, अशी माहिती संबंधित अधिकार्‍यांनी दिली.