Breaking News

संभाजी राजेंवर अवमानकारक मजकूर असलेल्या पुस्तकाची होळी बुलडाण्यात तिव्र निषेध; जिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन


बुलडाणा,(प्रतिनिधी)ः सर्व शिक्षा अभियानअंतर्गत लाखो शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानजनक मजकूर छापण्यात आलेला आहे. त्यांना ‘दारूडा’ संबोधून त्यांचा एकेरी उल्लेख केला गेला असल्याने समस्त संभाजी महाराज प्रेमींच्या भावना संतप्त असून सर्वत्र याचा निषेध केला जात आहे. या पुस्तकावर तत्काळ बंदी घालण्यात यावी तसेच लेखिका आणि प्रकाशक यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी करीत बुलडाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निदर्षने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी तसेच खा. प्रतापराव जाधव यांना निवेदन देण्यात आले. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शालेय अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्यात आलेल्या लेखिका डॉ. सौ. शुभा साठे तसेच प्रकाशक संध्या चंद्रकांत लाखे नागपुर यांनी प्रकाशित केलेल्या ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकातील पान क्र. 18 वर संभाजी महाराजांविषयी विकृत लेखन करण्यात आलेले आहे. महाराजांचा एकेरी भाषेत उल्लेख करीत त्यांना अत्याचार करणारा तसेच दारूच्या जाळ्यात सापडलेला, असे लिहीण्यात आले आहे. संभाजी महाराजांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणारा तसेच त्यांना बदनाम करणारा हा मजकूर पाहिल्यानंतर समस्त मराठी माणसाच्या भावना संतप्त झाल्या आहेत. लाखोंच्या प्रतित या पुस्तकाचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आलेले आहे. 

बालविद्यार्थ्यांच्या मनावर छत्रपती संभाजी महाराजांचा खोटा आणि विकृत इतिहास बिंबविण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप येथील निषेधकर्त्यांनी केला आहे. सदर पुस्तकावर तत्काळ बंदी घालावी तसेच पुस्तकाचे प्रकाशक आणि लेखिका या दोन्हींविरोधात कारवाई करावी, अशी जोरदार मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनावर अदिती अर्बन बँकेचे सुरेश देवकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी, जि.प. सदस्य डी.एस. लहाने, अ‍ॅड. जयसिंग राजे देशमुख, अ‍ॅड. मोहनदादा पवार, शिवसेनेचे मोहन पर्‍हाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कुणाल पैठणकर, छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष भारत शेळके, नाभिक महामंडळाचे शहराध्यक्ष राजेश नाईकवाडे, सचिव अमोल सुरडकर, छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे समन्वयक रणजीतसिंग राजपूत, मुख्य कार्यवाहक सागर काळवाघे, राष्ट्रवादी सोशल मिडीया सेल अध्यक्ष महेश देवरे, उपाध्यक्ष अनिल रिंढे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अनिल बावस्कर, अंबरीश घोडके, सम्राट संघटनेचे आशिष खरात, राकाँ सेवादलचे संतोष पाटील, जिल्हा एनएसयुआयचे अध्यक्ष शैलेश खेडकर याच्या विविध पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या सहया आहेत.