Breaking News

साई मंदिर परिसरावर सुरक्षा रक्षक आणि ‘ड्रोन’ची करडी नजर


शिर्डी / प्रतिनिधी 

साईंच्या समाधी दर्शनासाठी वर्ष भरामध्ये तीन कोटीच्या आसपास भाविक येत असतात. साईंचे दर्शन घेऊन मनोकामना पूर्ण होत असल्याने जशी गर्दी वाढत आहे, तशी साईमंदिर सुरक्षेची यंत्रणाही अतिशय दक्ष करण्यात आली आहे. मंदिर परिसराची सुरक्षेची पहाणी ड्रोनच्या माध्यमातून केली जाणार आहे. सध्या मंदिर परिसरात १५० कॅमेरे, ९०० सुरक्षा रक्षक, १०० पोलीस जलद कृतीदलाचे १० जवान यासाठी २४ तास तेनात आहेत, अशी माहिती साईबाबा संस्थानचे सुरक्षा प्रमुख आनंद भोईटे यांनी दिली 

साईबाबा संस्थानला सुरक्षेच्या कामात मदत व्हावी म्हणून एका भक्ताने ड्रोनची भेट दिली. लवकरच त्याची चाचणी मंदिर परिसरावर केली जाणार आहे. मंदिर परीसरातील गुन्हेगारी रोखण्यास मंदिर सुरक्षा विभागाला व पोलीसांना यामुळे यश मिळाले आहे. मंदिर परिसरात चारही बाजूंनी १०० सी. सी. टि. व्ही. कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मंदिराच्या चारही बाजुच्या परीसरासह रस्त्यावरील बारीक सारीक घटना जास्त क्षमतेच्या बसविलेल्या कॅमेऱ्यामध्ये पकडल्या जाणार आहेत. त्यामुळे याचा फायदा सुरक्षा यंत्रणेला मोठ्या प्रमाणात होणार आहे. साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधिक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा यंत्रना दक्ष असल्याचे डि.वाय.एसपी. आनंद भोईटे यांनी सांगितले.