Breaking News

राम साबळे यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या!मातंग समाजाच्या वतीने सिंदखेडराजा तहसिल कार्यालयावर इशारा मोर्चा 

सिंदखेड राजा(प्रतिनिधी): 
सिंदखेडराजा तालुक्यातील आडगाव राजा येथे 10 ऑक्टोबर रोजी झालेल्या राम साबळे यांच्या हत्येच्या निषेधार्थ तसेच खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासह इतर मागण्यासाठी मातंग समाजाच्या वतीने 22 ऑक्टोबर रोजी भव्य इशारा मोर्चा काढण्यात आला. जिजामाता जन्मस्थाना समोरून निघालेल्या या मोर्चात तालुक्यातील शेकडो मातंग समाज बांधव सहभागी झाले होते. शहराच्या प्रमुख मार्गाने हा मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला. तहसील कार्यालयावर येताच मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी मार्चाला संबोधित केले. त्यानंतर तहसीलदार संतोष कणसे यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये आडगाव राजा येथे 10 ऑक्टोबर रोजी राम साबळे या युवकाची चाकूने हल्ला करून भिष्मा बिल्होरे याने खून केला होता. तर बबन साबळे, गजानन साबळे, कृष्णा साबळे यांना चाकू मारुन गंभीर जखमी केले होते. या प्रकरणातील आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्रामधील मातंग समाजामध्ये या घटनेच्या विरोधात प्रचंड रोष आहे. या खून प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, पोलिसांनी पीडितांना विश्‍वासात घेत योग्य तपास करावा, बयान व पंचनामे व नकला पीडितांना देण्यात याव्यात. तपासात दिरंगाई झाली तर आणखी मोर्चा काढण्यात येईल, समाजकल्याण अधिकारी बुलडाणा यांनी भेट देवुन मदतीची प्रक्रिया पार पाडावी, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येवून त्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या मोर्चात रंगनाथ साबळे, कैलास खंदारे, विलास साबळे,संजुबाबा गायकवाड, सचिन क्षीरसागर, गजानन गायकवाड, देवानंद धोंगडे, सतीष कांबळे, अनिल लोखंडे, शिवा धोंगडे यांच्यासह शेकडो मातंग समाज बांधव सहभागी झाले होते.