Breaking News

दुधात भेसळ करणार्‍यावर कठोर कारवाईचे आदेश


मुंबई : मुंबई मध्ये रोज लाखो लिटर दुधाची विक्री होते. सणासुदीच्या काळात ग्राहकांना भेसळ युक्त दूध घ्यावे लागू नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मुंबईत येणार्‍या दुधाची तपासणी करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. काल झालेल्या मोहिमेत सुमारे साडे तीन लाख लिटर दूध सील केले गेले तर किमान 20 हजार लिटर भेसळ युक्त दूध नष्ट केले आहे. मुंबईमध्ये प्रवेश करणार्‍या मुलुंड नाका, दहिसर नाका, मानखुर्द नाका, ऐरोली टोल नाका, मुलूंड पूर्व नाका या पाच ठिकाणी दुधाची तपासणी करण्याची मोहीम राबवली गेली. अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरिश बापट यांच्या मार्गदर्शनात झालेली ही मोहीम पाचही ठिकाणी एकाच वेळी पहाटेपर्यंत सुरु होती.

या तपासणीमध्ये 227 वाहनांतील 9 लाख 22 हजार 928 लिटर दूध तपासण्यात आले या प्राथमिक तपासणीत दुधाचे पाच ब्रँडचे नमुने कमी प्रतीच्या दर्जाचे आढळले त्यामुळे 3 लाख 44 हजार लिटर दूध सील केले तसेच दुधाच्या आठ टँकरमध्ये भेसळयुक्त दूध आढळून आले. या भेसळीमध्ये अमोनिआ सल्फेट, शुगर, माल्टोडेक्स्ट्रीन हे घातक पदार्थ आढळले. त्यामुळे हे 19 हजार 250 लिटर दुध नष्ट करण्यात आले. हे दूध ज्या जिल्ह्यातून आले होते, त्या जिल्ह्यातील संबंधित अधिकार्‍यांवर यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. या मोहिमेत अन्न व औषध प्रशासनाचे 60 ते 70 अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.