Breaking News

केडगांवमध्ये बुधवारी गाजणार कुस्तीचे मैदान


केडगाव / प्रतिनिधी 

कुस्ती ही महाराष्ट्राची आण-बाण आणि शान. हिंदकेसरी, महाराष्ट्रकेसरी गणपत आंदळकर, हरिश्चंद्र बिराजदार, मारुती माने अशा कितीतरी मल्लांनी कुस्तीचे मैदान गाजवले. या कुस्तीला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी केडगांवकर सरसावले आहेत. या पार्श्वभूमीवर वीस वर्षांनंतर प्रथमच नवरात्री उत्सव आणि केडगांवची ग्रामदेवता रेणुकामाता यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या बुधवारी (दि. १७) दुपारी ३ वाजता केडगांव देवीरोड, आंबेडकर भवनजवळ भव्य कुस्ती दंगल होणार आहे.
या कुस्ती मेळ्यासाठी राज्यासह अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र चँम्पियन यांची उपस्थिती राहणार आहे. यासाठी प्रथम बक्षीस दोन लाख रुपये, द्वितीय बक्षीस एक लाख, तृतीय ७५ हजार तर चतुर्थ बक्षीस ५१ हजार रुपये आहे. अर्जुन पुरस्कार विजेते काकासाहेब पवार यांचा पठ्ठा पै. गणेश जगताप आणि अर्जुन पुरस्कार विजेते स्व. गणपतराव आंदळकर व दुहेरी महाराष्ट्र केसरी विजेते चंद्रहार पाटील यांचा पठ्ठा पै. बाला रफिक शेख यांच्या लढती विषयी जास्त आकर्षण आहे. ज्येष्ठ कुस्ती निवेदक शंकर अण्णा पुजारी (कोठळीकर) हे निवेदक म्हणुन तर हलगीवादनाचे काम राजु आवळे (कोल्हापुरकर) हे करणार आहेत. भव्य कुस्त्यांची 'दंगल' पाहण्यासाठी नागरिकांसह कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समस्त केडगांव ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.