Breaking News

पो. नि. पवारांमुळे कैद्यांच्या मानसिकतेत सकारात्मक परिवर्तन

जामखेड ता. प्रतिनिधी

कारागृहाचा कायापालट करत येथील कैद्यांना वाचनाची आवड लावण्यात पोलिस निरिक्षक पांडुरंग पवार यांना बऱ्यापैकी यश आले आहे. पोलिस ठाण्याच्या कारभाराला शिस्त लावताना कैद्यांच्या मानसिकतेत सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे त्यांनी ठरविले आणि त्याचा परिणाम चांगला झाला.

कारागृहाच्या चार भिंतींच्या आत कैद्यांचे मन संकुचित होऊ नये, म्हणून पो. नि. पवार यांनी या कैद्यांना पुस्तक वाचनासाठी प्रवृत्त केले. येथील साहित्यिक व बाहुली नाटककार संतोष सरसमकर यांच्या पुस्तकांच्या प्रती पवार यांना देण्यात आल्या. जीवन कसे जगावे, हास्यरंगमंच निसर्गवाटा अशी पुस्तके यावेळी देण्यात आली. याप्रसंगी जामखेडचे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, कांतीलाल कोठारी, मंगेश अजबे, जयसिंग उगले उपस्थित होते. यावेळी बोलतांना संजय कोठारी म्हणाले, की वाचनाच्या व्यासंगातून मानवी मन शुध्द होऊन सकारात्मक विचार करीत असते. कैद्यांना अशा प्रकारची पुस्तके वाचायला मिळाली तर त्यांचे उर्वरित जीवन समृद्ध होईल. लेखक सरसमकर म्हणाले, की कारागृहातील कैदी जन्मापासूनचे गुन्हेगार नसतात. त्यांच्यातील खरा माणूस जागा करण्यासाठी पुस्तके वाचण्यासाठी सवय लागावी आणि मनपरिवर्तन होऊन त्यांनी चांगले जीवन जगावे, यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. पोलीस निरीक्षक पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.