Breaking News

परिसर स्वच्छता एक प्रकारची समाजसेवाच


पाटोदा, (प्रतिनिधी)- आपले घर, परिसर, गाव स्वच्छ ठेवणे हीच खरी समाजसेवा आहे. प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेपासून सुरुवात करावी. स्वच्छतेप्रति कटीबध्द राहणे हीच काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा.प्रल्हाद मुळे यांनी केले. येथील नवगण शिक्षण संस्था संचलित वसंतदादा पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत ‘स्वच्छता ही सेवा -२०१८’ या कार्यक्रमाअंतर्गत स्वयंसेवक प्रबोधन शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रासेयोचे कार्यक्रमाधिकारी डॉ.यादव घोडके होते तर डॉ.प्रशांत साबळे, डॉ.पंडित सिरसट, डॉ.संजय बोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा.प्रल्हाद मुळे म्हणाले, वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेची आज खरी गरज निर्माण झाली आहे. सर्व स्वयंसेवकांनी स्वच्छतेचे महत्त्व प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवावे. रोगराईमुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. पंडित सिरसट, डॉ. प्रशांत साबळे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा. कल्याण घोडके यांनी केले तर आभार प्रा.अर्चना चवरे यांनी मानले.