Breaking News

रिलायन्स बिग टीव्ही चॅनेलला ग्राहक मंचाचा दणका; ग्राहकाच्या सेवेत त्रुटीबाबत भरपाई देण्याचा दिला निकाल


ठाणे : प्रतिनिधी
रिलायन्स कंपनीच्या बिग टीव्ही चॅनेलच्या त्रुटीच्या सेवेबाबत ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करणाऱ्या तक्रारदाराला रिलायन्स बिग टीव्हीने 20 हजाराचे आणि मानसिक त्रासाबद्दल 10 टक्के व्याजासह मार्च 2012 पासून निकालापर्यंत नुकसान भरपाई द्यावी, तसेच 5 हजार रुपये हे दाव्याच्या खर्चापोटी देण्यात यावे असा निकाल नुकताच ग्राहक मंचाचे अध्यक्ष एस डी मडके यांनी दिला.


तक्रारदार दीपक प्रभू रा. विष्णूनगर, ठाणे यांनी रिलायन्स बिग टीव्ही चॅनेलची सेवा 16 जानेवारी, 2012 रोजी 13 महिन्यासाठी घेतली. त्यासाठी त्यांनी 1 हजार 770 रुपये दिले. परंतु सिग्नलमधील त्रुटीमुळे 21 फेब्रुवारी, 2012 पासून तक्रारदार प्रभू यांची सेवा खंडित झाली. रिलायन्स बिग टीव्ही कंपनीला तक्रार केली असता सेवा पुन्हा सुरळीत करण्यासाठी 175 रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली. त्यावेळी ग्राहक आणि तक्रारदार दीपक प्रभू यांनी भरलेली रक्कम 1 हजार 770 हि रक्कम 18 टक्के व्याजदराने आणि नुकसान भरपाईसह परत करण्याची रिलायन्स बिग टीव्ही चॅनेल कंपनीला विनंती केली.कंपनीच्या सेवेत त्रुटी निर्माण झाली डीटीएस सेवेमुळे सिग्नल न मिळाल्याने सेटपबॉक्स इन्स्टोल करण्यासाठी येणाऱ्या इंजिनीयरची फी शुल्क देणे हे कंपनीच्या पॉलिसीनुसार योग्य आहे. मात्र तक्रारदाराने सेवा पुन्हा सुरळीत करण्यास नकार दिला. त्यांनी सेवेच्या संबंधित सर्व उपकरणे परत दिली. असा युक्तीवाद ग्राहक मंचात रिलायन्स बिग टीव्हीच्या वतीने करण्यात आला. ग्राहकाने 1 हजार 770 रुपये शुल्क विनात्रुटी सेवेसाठी दिले होते. त्यानंतर दुरुस्तीसाठी अतिरिक्त शुल्क देण्यास तक्रारदार प्रभू हे तयार नव्हते. अखेर ग्राहक मंचाने तक्रारदाराने सादर केलेले पुरावे आणि प्रतिज्ञापत्र यामध्ये सेवेतील त्रुटी आणि त्याबाबत कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या असहकार्याच्या भूमिकेमुळे ग्राहक मंचाकडे न्याय मागण्यासाठी धाव घ्यावी लागली. या सर्व गोष्टींचा विचार करून अखेर ग्राहक मंचाचे अध्यक्ष मडके यांनी रिलायन्स कंपनीला नुकसान भरपाई देण्याचा निकाल दिला.