Breaking News

कृषी खात्याने शेतकर्‍यांना फसवले; पत्रकार परिषदेत सोळंकेंचा आरोप


माजलगाव, (प्रतिनिधी):-तालुक्यातील १२००० हेक्टर क्षेत्राचा विमा मंजूर करून शेतकर्‍यांच्या खात्यावर ७५६३ रुपये वर्ग करणे आवश्यक असताना ७१३४ रुपयाप्रमाणे जी रक्कम वर्ग केली यात हे. ४२९ रुपये याप्रमाणे कमी रक्कम शेतकर्‍यांना देऊन ५१ लाख रुपयाना गंडविण्याचा प्रयत्न कंपनी आणि कृषी खात्याने केला आहे. हा सर्व प्रकार येथील राजकीय नेतृत्व कमकुवत आणि अभ्यासहीन असल्याचा परिणाम असल्याचे मत माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. सुंदरराव सोळंके महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की तालुक्यातील माजलगाव, गंगामसला, आडगाव व तालखेड सर्कल मध्ये १२००० हे. क्षेत्राचा विमा मंजूर केला. परंतु येथील कृषी विभाग आणि पिक विमा कंपनीने सदरील प्रकरणात मोठ्या प्रमाणात अफरातफर करून जवळपास ५१ लाख रुपयांना शेतकर्‍यांना गंडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान ही बाब येथील शेतकरी शिवाजी शेजूळ, संजय शेजुळ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सदर प्रकरणात शासनाकडे तक्रार केली. त्यामुळे कंपनीचा आणि येथील कृषी खात्याचा प्रकार उघड झाला आहे. या सर्व प्रकारात येथील सत्ताधारी पक्षात आमदार असणार्‍या देशमुखांनी लक्ष घालने गरजेचे होते परंतु येथील आमदार म्हणून लाभलेले राजकीय नेतृत्व अभ्यासहीन व अकुशल असल्याचा हा परिणाम असल्याचेही यावेळी प्रकाश सोळंके यांनी सांगितले. दरम्यान सदरील प्रकाराने शेतकरी जागृत झाला असून सर्व शेतकर्यांच्या वतीने या प्रकारात जनहित याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली तर दुष्काळी परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले की मान्सून पाऊस वापस परतला असून शासनाने बीड जिल्हा त्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करून येथील कष्टकर्‍यांना, शेतकर्‍यांना रोजगार निर्मिती उपलब्ध करून द्यावी.नसता येणार्‍या काळात मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. या पत्रकार परिषदेला सभापती अशोक डक, जयदत्त नरवडे, अड. भानुदास डक, शिवाजी शेजूळ, संजय शेजुळ, दीपक जाधव उपस्थित होते.