Breaking News

पत्रकारावरील हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी


बुलडाणा,(प्रतिनिधी): पेट्रोलमध्ये पाणी मिश्रित असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक रिलायन्स पेट्रोल पंपावर गेलेले पत्रकार जितेंद्र कायस्थ आणि त्यांच्या टीमच्या सदस्यांना पंपचालकाने केलेल्या मारहाणीच्या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकारांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. शहरातील मलकापूर रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपावर 9 ऑक्टोबरला पाणी मिश्रित पेट्रोल विकले जात असून, या माध्यमातून ग्राहकांची लूट होत असल्याच्या काही लोकांच्या तक्रारी होत्या. याबाबत माहिती घेण्यासाठी पत्रकार जितेंद्र कायस्थ तसेच त्यांचा मुलगा शुभम हे दोघे गेले होते. दरम्यान, पाणी मिश्रित पेट्रोलची व्हिडिओ शूटिंग करत असताना पेट्रोल पंप चालक नितीन सावजी यांनी जितेंद्र कायस्थ व शुभमला मारहाण केली. त्यामुळे संबंधित पेट्रोल पंप तत्काळ सील करून या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू आणि भेसळ कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर पत्रकार राजेंद्र काळे,संदीप शुक्ला, भानुदास लकडे, चंद्रकांत बर्दे, सिद्धार्थ आराख, राजेश डिडोळकर, लक्ष्मीकांत बगाडे, सुनील तिजारे, नितीन शिरसाट, अ‍ॅड. हरिदास उंबरकर, अनिल म्हस्के यांच्या सह्या आहेत.