Breaking News

पैनगंगा नदीच्या पुलावर कठडे बसविण्याचे काम सुरू

धनोडा फाटा ते माहूर या मुख्य रस्त्यावर पैनगंगा नदी वरील पुलाचे कठडे पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे वाहून गेले होते. याबाबत नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे व यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी माहूर येथे नवरात्र महोत्सवानिमित्त रेणुका देवीच्या दर्शनाला जात असताना पुलावरची सद्यस्थिती पाहून फोनवर संपर्क साधून पुलाच्या सद्यपरिस्थितीचे फोटो व माहिती दिली.

दोन्ही बाजूचे कठडे उघडे असल्यामुळे अपघाताचे प्रमाण होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन व सध्या माहूर येथे नवरात्र महोत्सव असल्यामुळे लाखो भाविक या पुलावरून माहूर येथे दर्शनासाठी जातात. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तात्काळ पुलावर रंगरंगोटी, साफसफाई करून त्यावर कठडे बसविण्याची मागणी भागवत देवसरकक्षर यांनी केली होती. याबाबत सामाजिक बांधिलकी जपत कर्तव्यदक्षपणाने तात्काळ दखल घेत नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे व यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख या दोन्ही अधिकाऱ्यांनी या कामी लक्ष घालून तातडीने हालचाली करून कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग नांदेड व सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळ यांच्याशी संपर्क साधून तातडीने लाखो भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पैनगंगा नदीवर तुटलेले रोलिंग ताबडतोब आपत्कालीन व्यवस्थापणे अंतर्गत बसविण्यात यावेत, तसेच साईड पट्‌ट्यांना कलर देऊन झाडेझुडपे काढावीत. रस्त्यावरील खड्डे भरावीत व त्यावर माहिती फलक बसवून भाविकांच्या होणाऱ्या त्रासापासून सुटका करावी, असे आदेश दिले. या आदेशाची अंमलबजावणी होऊन आज पुलावरील कठडे व साफसफाईचे काम त्वरित सुरू झाले. यामुळे माहूर येथील नवरात्र महोत्सव भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक मोठी उपाययोजनाच दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्यामुळे भाविकांत व प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये समाधान झाल्याचे भागवत देवसरकर यांनी सांगितले.