Breaking News

देशोद्धारक महापुरुषांच्या कार्याचा गुरुजींना पडला विसर; जयंती कार्यक्रमात कुचराई ; शिक्षण विभाग अंधारात


कुळधरण: प्रतिनिधी

समाज सुधारक तसेच महापुरुषांचे आदर्श विद्यार्थ्यांनी अंगीकारावेत, यासाठी शाळांमधून विविध महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमांचे आयोजन करणे शाळांना बंधनकारक आहे. जयंतीचे औचित्य साधून विविध उपक्रम, स्पर्धा, कार्यक्रम घेणे अपेक्षित आहे. मात्र कर्जत तालुक्यातील काही शाळांना याचा विसर पडला आहे. शाळांमधून जयंती कार्यक्रमच घेतले जात नसल्याची गंभीर बाब समोर येत आहे. या प्रकाराकडे जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने लक्ष देऊन अशा शाळांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

शालेय विद्यार्थ्यांसमोर महापुरुषांचे आदर्श निर्माण व्हावेत, यासाठी शासनाच्या परिपत्रकानुसार जयंती कार्यक्रम घेणे शाळांना बंधनकारक आहे. काही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त शाळांना सुट्टी दिली जाते. मात्र शाळांनी आपल्या सोयीनुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे बंधनकारक आहे. आजची बालके भविष्यातील सुजाण नागरिक बनविण्यासाठी त्यांच्यावर संस्काराची गरज असते. हे संस्कार घडविण्यासाठी शाळा महत्त्वाची भूमिका पार पाडतात. विद्यार्थ्यांसमोर महापुरुषांचे आदर्श समोर ठेवून त्यांच्यावर योग्य संस्काराची रुजवणूक केली जाते. महापुरुषांची जयंती हे त्यासाठीचे महत्त्वाचे औचित्य असते. जयंती कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांची भाषणे, विविध प्रकारच्या स्पर्धा, मान्यवर वक्त्यांची भाषणे घेऊन महापुरुषांची त्यांना ओळख करून देणे हे शाळांचे काम असते. अशा कार्यक्रमांमध्ये स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तसेच शाळेचे हितचिंतक यांनाही सहभागी करून घेता येते. याकामी मुख्याध्यापकाने महत्त्वाची भूमिका बजावत कार्यक्रमांचे आयोजन करणे अपेक्षित असते. सर्व शिक्षकांच्या सामुदायिक योगदानातून विद्यार्थ्यांसमोर समाजसुधारकांच्या कार्याचा आदर्श निर्माण करणे, हा या उपक्रमांचा मूळ हेतू आहे. कर्जत तालुक्यातील काही शाळा मात्र याला अपवाद ठरत आहेत. सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा राव फुले, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आदी महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करणे गरजेचे आहे. मात्र कर्जत तालुक्यातील काही शाळांनी शासकीय नियम धाब्यावर बसवले आहेत. महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्याची तसदीही शाळांमधून घेतली जात नसल्याचा प्रकार समोर येत आहे. दोन शिक्षक असलेल्या शाळांमध्ये हा प्रकार अधिक प्रमाणावर घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. 

नुकतीच झालेली महात्मा गांधी जयंतीही शाळांमधून साजरी झाली नसल्याचे कुळधरण येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. हा प्रकार घडत असतानाही शिक्षण विभाग मात्र अंधारातच आहे. या गंभीर प्रकाराकडे कर्जतचे गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी यांनी शाळांना भेटी देऊन याबाबत माहिती घेण्याची गरज आहे. दोषी असलेल्या शाळांवर तात्काळ गंभीर कारवाई करण्याची गरज सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

अशा शाळांवर कारवाई

शासनाने दिलेल्या परिपत्रकात नमूद केलेल्या महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करणे शाळांना बंधनकारक आहे. असे कार्यक्रम साजरे होत नसल्याची माहिती उपलब्ध झाल्यास तात्काळ पुढील कारवाई केली जाईल. यासंदर्भात शाळांना लेखी पत्र देत आहोत. 

लक्ष्मण पोले, शिक्षणाधिकारी, अहमदनगर.