Breaking News

प्रकल्पातील कमी जलसाठ्यामुळे निर्माण होणार पाणीटंचाई


धाड,(प्रतिनिधी): अत्यल्प पाऊसमान, खालावत जाणारी पाण्याची पातळी, हिवाळा आणि उन्हाळा धरून एकूण 8 महिने आवश्यक असणारा जलसाठा आणि उपलब्ध तोकडा पाण्याचा साठा पाहता सर्वदूर भीषण पाण्याची टंचाई भेडसावणार असून धाड व परिसरातील असलेल्या धरणात सध्या थोडाच पाण्याचा साठा उपलब्ध असल्याने धरणावर आधारित 20 गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. धाड भागात करडी, मासरूळ, ढालसावंगी, शेकापूर, बोदेगाव या ठिकाणी मध्यम प्रकल्प असून त्यामध्ये जेमतेम पाणीसाठा उपलब्ध आहे.

खरीप हंगाम हा नुकसानीचा ठरल्याने आज या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात रब्बी पेरणीसाठी धरणातील पाण्याचा उपसा करून घेत आहेत. कमी पाण्यावर येणारे रब्बीच्या हरभरा पेरणीवर त्याचा भर आहे. मात्र या प्रकाराने धरणांमधील असणारा पाण्याचा साठा जलदगतीने कमी होत आहे. परिणामी धाड व भागात भयावह पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात धाड ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हाधिकारी बुलडाणा यांना निवेदन देण्यात आले असून प्रशासनाने धाड भागातील धरणांमधील उपसा होणारा जलसाठा तत्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने वेळीच या गंभीर प्रश्‍नावर तत्काळ उपाययोजना करून धरणातील असणारा पाण्याचा साठा संरक्षित करून पिण्याचे पाण्याचा प्रश्‍न सोडण्यावर भर देण्याची मागणी होत आहे. परिसरातील एकाही गावात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडला नाही. पाण्याअभावी खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोयाबीन पीक पूर्णपणे सुकले, तर कपाशी कशीबशी तग धरून उभी आहे. मात्र पाण्याची ही कमतरता आता शेतकर्यांपुरतीच मर्यादित राहिली नसून ग्रामस्थांना देखील याची झळ बसणार आहे. ऐन हिवाळ्यामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे वेळ काही गावांवर येण्याची शक्यता असून त्यामुळे परिसरात उन्हाळ्यापेक्षा ही कठीण परिस्थितीचा सामना ग्रामस्थांना करावा लागणार आहे.