Breaking News

जिल्हा परिषद शाळेत सर्पाविषयी जनजागृती कार्यक्रम


नेवासा/प्रतिनिधी
नेवासा शहरातील जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्रजी मुले शाळेमधील विदयार्थ्यांना सापांची भीती दूर होऊन शास्त्रीय माहिती मिळावी या उद्देशाने निसर्ग सर्प विज्ञान संस्थेचे अध्यक्ष सर्प मित्र प्रा.ज्ञानेश्‍वर म्हात्रे यांचा जनजागृती कार्यक्रम नुकताच पार पडला. रत्नागिरी जिल्ह्यातील महाराष्ट्र शासन वनविभागाचे सर्पमित्र प्रा.ज्ञानेश्‍वर म्हात्रे यांनी नेवासा खुर्द मुले शाळेस भेट दिली. याप्रसंगी मुलांना सापांबद्दल असणारी भीती दूर व्हावी व सर्पदंश झाल्यास प्रथमोपचाराबद्दल शास्त्रीय माहिती मिळावी या उद्देशाने अशा सहशालेय उपक्रमाचे आयोजन केले. असल्याचे मुख्याध्यापिका मंगला म्हस्के यांनी सांगितले. जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी दगडू तळपे,प्रभारी केंद्रप्रमुख शाम फ़ंड हे उपस्थित होते. यावेळी प्रा.म्हात्रे यांनी विध्यार्थ्यांना सापांचे उगमस्थान, सापांचा आजवरचा प्रवास, नागाचे प्रकार, विषारी बिनविषारी साप कसे ओळखायचे व त्यांची नावे, सापांचे व नागांचे सोशल मीडिया द्वारे प्रसारित होणारे व्हिडिओ व वास्तव सत्य, साप कात कशी टाकतात, त्यांचा जीवनक्रम, भारतीय संस्कृतीत असलेले सापांचे महत्व, सापांचे खाद्य, सरपटणारे प्राण्याबद्दल गैरसमज, सर्पदंश होऊ नये म्हणून व झाल्यावर करावयाचा प्रथमोपचार याबाबत विविध शास्त्रीय माहिती पोस्टर द्वारे दाखवून जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन व प्रास्ताविक शिक्षक राहुल आठरे यांनी केले. शाळेच्या वतीने सर्पमित्र प्रा.म्हात्रे यांचे स्वागत साईनाथ वडते यांनी केले. यावेळी सर्पमित्र म्हात्रे यांनी स्वतः प्रकाशित केलेली पुस्तके, सापांचे माहितीपर फलक शाळेस भेट दिली. विविध प्रकारची सर्प हाताळून विद्यार्थ्यांची भीती दूर केली. शिक्षक अरविंद घोडके यांनी आभार मानले तर सुत्रसंचालन आण्णासाहेब शिंदे यांनी केले. यावेळी सेवानिवृत्त शिक्षिका शीला नाईक, छाया वाघमोडे, प्रतिभा पालकर, मिनाक्षी लोळगे,विद्या खामकर, अश्‍विनी मोरे, प्रतिमा राठोड, प्रतिभा गाडेकर यांच्यासह पालक उपस्थित होते.