Breaking News

सातार्‍यात दोन्ही राजे आमने-सामने; पोलिसांच्या मध्यस्थीमुळे वाद टळला


सातारा : जुन्या मोटार स्टॅण्डवर असलेले दारुच्या दुकानावरुन सोमवारी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांची भंबेरी उडली. दरम्यान, समोरासमोर आलेल्या दोन्ही राजांनी थेट एकमेकांशी एक शब्दही बोलला नसला तरी त्यामुळे निर्माण झालेली तणावाची स्थिती आगामी निवडणुकीत काहीही होवू शकते याची झलक पहावयास मिळाली.

याबाबत अधिक माहिती अशी, जुन्या मोटार स्टॅण्डवर खुटाळे यांच्या जागेत आमदार शिवेंद्रराजे गटाचे नगरसेवक रवींद्र ढोणे हे भाडेतत्वावर दारुचे दुकान चालवतात. सोमवारी दुपारी साडेबारा एकच्या दरम्यान, याठिकाणी खासदार उदयनराजे आले आणि त्यांनी दारुचे दुकान बंद करण्याच्या सूचना केल्या. परिणामी येथील कामगारांनी मालक ढोणे यांना याची माहिती दिल्याने तेही उपस्थित झाले. यावेळी उदयनराजेंनी दुकान बंद करा असा आदेश दिल्याचे नगरसेवक ढोणे यांचे म्हणणे आहे. वस्तुत: खुटाळे आणि ढोणे यांचा न्यायालयीन खटला सुरु आहे न्यायालयाने दुकान जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत, असे ढोणे यांचे म्हणणे आहे. माझे दुकान अनधिकृत असल्यास ते मी बंद करण्यास तयार आहे मात्र, उदयनराजेंनी न्यायालयाचा तसा आदेश दाखवावा असेही त्यांचे म्हणणे आहे. मी केवळ आमदार शिवेंद्रराजे गटाचा नगरसेवक असल्यानेच खासदारांनी माझ्या दुकानावर वक्रदृष्टी फिरवली आहे. त्यांनी शहरातील इतर अवैध धंदे करावेत आमच्या पोटावर पाय देवू नये अन्यथा आम्हालाही जशास तसे वागता येईल असेही त्यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, सकाळी उदयनराजे आल्यानंतर काही वेळातच शिवेंद्रराजेही याठिकाणी आले. व हे दुकान बंद करण्यास त्यांनी मनाई केली. दोन्ही राजे एकाच परिसरात असल्याने त्यांचे समर्थकही मोठ्या प्रमाणावर गोळा झाले. त्यामुळे याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी पोलिसांनी प्रथम आमदार शिवेंद्रराजे यांना या परिसरातून निघून जाण्याची सूचना केली. मात्र संतप्त झालेल्या शिवेंद्रराजेंनी आधी त्यांना जायला सांगा असे सांगत विरोध प्रकट केला मात्र, पोलिसांनी लॉ अ‍ॅण्ड ऑर्डर तयार होत असल्याचे सांगितल्याने त्यांनी या परिसरातून जाणे पसंत केले. त्यानंतर काही वेळाने उदयनराजेही या परिसरातून निघून गेले.