Breaking News

विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाची गरज ः सीए रमेश फिरोदिया


नगर । प्रतिनिधी -
विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच व्यवहारिक ज्ञान मिळाले पाहिजे. विद्यार्थी हा सर्वगुणसंपन्न झाला पाहिजे. शालेय अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांमधील कला-गुणांना वाव मिळाल्यास त्यांच्यातील कला प्रात्याक्षिकातून बाहेर येऊन त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते. दिपावली हा आपल्या संस्कृतीतील सर्वात मोठा सण आहे. या सणामध्ये प्रत्येकजण घर सजवत असतो. त्यासाठी विविध साहित्यांचा वापर करतो. पणती, आकाश कंदिलाने घराबरोबरच परिसर सुशोभित होत असतो. विद्यार्थ्यांनी बनविलेले हे साहित्य दिवाळी सणाला अधिकच आनंददायी करणारे आहे. त्यातून होणारी कमाई ही विद्यार्थ्यांमधील कौशल्याची पावतीच असेल. कलेला व्यवहारीक ज्ञानाची दिलेली जोड विद्यार्थ्यांना परिपूर्ण करणारी आहे, असे प्रतिपादन संस्थेचे विश्वस्त सीए रमेश फिरोदिया यांनी केले.

शिशू संगोपन संस्थेच्या सविता रमेश प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या दिपोत्सव बाजारचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सविताताई फिरोदिया, संस्थेचे अध्यक्ष शांतीलाल गुंदेचा, उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव र. धोें. कासवा, सहसचिव राजेश झालानी, विश्वस्त अ‍ॅड. विजय मुनोत, मनपा प्रशासनाधिकारी संजय मेहेर, एल. के. आव्हाड, मनसुखलाल पिपाडा, दीपक गांधी, रमेश मुनोत, शिवनारायण वर्मा, भंडारी, प्राचार्या कांचन गावडे, मुख्याध्यापिका योगिता गांधी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सविता रमेश फिरोदिया म्हणाल्या, अनेक विद्यार्थ्यांमध्ये विविध कला लपलेल्या असतात. या कलेला प्रोत्साहन दिल्यास ते चांगल्या वस्तूंची निर्मिती करू शकतात. याच उद्देशाने दिवाळीनिमित्त पणत्या, आकाश कंदील व दिवाळीत लागणारे साहित्य विद्यार्थ्यांनी बनविले आहेत. प्रास्ताविक मुख्याध्यापिका योगिता गांधी यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती कार्ले यांनी केले. प्राचार्या कांचन गावडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विनोद कटारिया, प्रा. शिंदे, गीते, ज्योत्स्ना उद्योग केंद्राच्या श्रीमती गायकवाड, कुटे, मूकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या स्टॉलला शिक्षक, पालक, मान्यवरांनी भेट देऊन वस्तू खरेदी केल्या.