Breaking News

देऊळगाव मही येथे स्वाभिमानीचे रास्ता रोको आंदोलन


देऊळगाव मही,(प्रतिनिधी): स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 20 ऑक्टोबर रोजी देऊळगाव मही येथील डिग्रस चौक शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांकरिता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकर्‍यांच्या अनेक प्रश्‍नांबाबत सरकारला वारंवार निवेदन देऊन सुद्धा सरकारने या गंभीर प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी देऊळगाव मही येथे लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सादर आदोलन हे शांततेच्या मार्गाने करण्यात आले. 

यावेळी आंदोलनकर्त्यांनी सोयाबीन, कापूस उत्पादकाना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, शासनाने शेतकर्‍यांकडून खरेदी केलेल्या हरभरा, तूर व उदीडाचे चुकारे तत्काळ द्यावे, ऑनलाइन नोंदी केलेल्या तूर उत्पादक शेतकर्‍यांचे अनुदान बँक खात्यात त्वरित जमा करावे, वन्य प्राण्यांपासून शेतातील नुकसान टाळण्यासाठी शेतकर्‍यांच्या शेताला कुंपण द्यावे, सोयाबीन, उडीद, मूगाचे खरेदी केंद्र चालू करावे, पेट्रोल डीझेलचे भाव कमी करावे, शेतकर्‍यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी, बेरोजगार व युवकांना बिना अटीवर बँकेकडून मुद्रा लोन द्यावे, शेतकर्‍यांना नियमित सुरळीत वीज पुरवठा देण्यात यावा, जाळलेले रोहित्र मोफत जोडण्यात यावे आदी मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात बबनराव चेके, पुंडलिक शिंगणे, शे. जुल्फेकार, संतोष शिंगणे, मधुकर शिंगणे, गणेश शिंगणे, विष्णु देशमुख, भगवान मुंढे, अंबादास बुरकुल, गजानन रायते, प्रवीण राऊत, सतीश देशमुख, वैभव भुतेकर, समाधान शिंगणे, शेख अफसर भाई, इन्नुस बागवान, माजित भाई, सरफराज भाई, किरण साळवे, सचिन साळवे, सतीश परिहार, समाधान देवखाणे आदींसह शेतकरी बांधव व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला. यावेळी आंदोलांनाच्या बंदोबस्तासाठी बुलडाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच देऊळगाव राजा व देऊळगाव महीचे पोलिस अधिकारी व कर्मचारी हजर होते.