Breaking News

गेवराई तालुक्यात दुष्काळ जाहिर करा


गेवराई,(प्रतिनिधी)ः- तालुक्यात पावसाअभावी ५० % हुन कमी क्षेत्रावर खरीपाची पेरणी झालेली असतांनाही शासनाच्या दबावापोटी केलेला पिक कापणी प्रयोग आणि कार्यालयात बसुन दिलेले पैसेवारीचे आकडे शेतकर्यांवर अन्यायकारक आहेत. तालुक्यातील १८४ गावे आणि १० महसुल मंडळात गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे,शेतकरी हवालदिल झाला असुन त्याला दिलासा देण्यासाठी शासनाने तात्काळ दुष्काळ जाहिर करुन त्या बाबतच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली. या बाबतचे लेखी निवेदन तहसिलदारांना देण्यात आले. 

भाजपा-शिवसेना युतीच्या शासनाला महागाईवर नियंत्रण मिळविण्यात सपशेल अपयश आले आहे,पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा गंभीर परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे यातच दुष्काळाची भर पडली आहे. गेवराई तालुक्यात सुमारे ४५ ग्रामपंचायतींनी टँकरची मागणी करुनही टँकर मंजुर केले जात नाहीत,पावसा अभावी ५० हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी झालेली नाही. ऊस,कापुस,सोयाबीन,बाजरी यासह अनेक पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे,पिक विमा नुकसान भरपाई आणि बोंडआळीच्या अनुदानावर बँका नफेखोरी करत आहेत. पिकांचे मोठे नुकसान झालेले असतांनाही पैसेवारी आणि पिक कापणी प्रयोगाची आकडेवारी देतांना शासनाच्या दबावापोटी शेतकर्यांवर अन्याय केला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकर्यांमध्ये शासन विरोधी चिड आणि असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभुमीवर गेवराई तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने तालुक्यात दुष्काळ जाहिर करुन तात्काळ दुष्काळी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. या बाबत गुरुवार दि. ४ ऑक्टोबर रोजी तहसिलदार,गेवराई यांना निवेदन देवुन अंदोलनाचा इशारा देण्यात आला. 
दुष्काळ जाहिर करा,तुर आणि हरभर्याचे चुकारे तात्काळ अदा करा,पिक विमा आणि बोंडआळीच्या अनुदानाची 
रक्कम तात्काळ वाटप करा,कर्ज वसुली स्थगित करुन शेतसारा माफ करा,चारा डेपो आणि छावण्या तात्काळ सुरु करा,रोजगार हमी योजनेतील कामे सुरु करुन कष्टकर्यांच्या हाताला काम द्या,विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परिक्षा शुल्क माफ करा,मागणी नुसार टँकर मंजुर करा,उच्च दाबाने विज पुरवठा करा,पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्या यासह सुमारे सतरा विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने तहसिलदारांना देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर,सभापती जगन पाटील काळे,डिगांबर येवले,जयभवानीचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, जि.प .सदस्य फुलचंद बोरकर,जिल्हा सरचिटणीस कुमारराव ढाकणे, भवानी बँकेचे उपाध्यक्ष महंमद गौस,विधानसभा क्षेत्र अध्यक्ष समाधान मस्के,सुभाष महाराज नागरे,आनंद सुतार,गुफरान ईनामदार,दत्ता दाभाडे,गोरखनाथ शिंदे,झुंबर निकम,खालेद कुरेशी,श्रीराम आरगडे,गणपत काळे,विजय राठोड,संदिप मडके यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.