Breaking News

सेल्फायटीस, फेसबुक अ‍ॅडिक्शन हे आजारच : अच्यूत गोडबोले


बुलडाणा,(प्रतिनिधी): क्रुझमधील सुरक्षा रेलींग ओलांडून मिसेस मुख्यमंत्री फडणवीस यांनी सेल्फी काढल्याचा मुद्दा सोशल मिडियावर चांगलाच ट्रोल होत असतानाच सेल्फायटिस, फेसबुक अ‍ॅडिक्शन डिसऑर्डरसारखे आजार आता समोर येत आहेत. 2025 पर्यंत जगातील 25 टक्के लोकसंख्येला मानसिक आजार जडेल, असे महत्त्वपूर्ण भाकित आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याख्याते तंत्रज्ञ, विज्ञान, संगणक आणि तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर विपूल लेखन करणारे अच्यूत गोडबोले यांनी बुलडाणा येथे केले. 

बुलडाणा येथे 21 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आलेल्या एका व्याख्यानाच्या निमित्ताने ते आले होते. त्यावेळी स्थानिक बुलडाणा अर्बन रेसीडेन्सीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. सोशल मिडियात वाढता सेल्फीट्रेन्ड, फेसबुक अ‍ॅडिक्ट आणि वतर्ममानस्थितीत भरकटलेला युवक या मुद्यांना धरून त्यांना विचारणा केली असता त्यांनी उपरोक्त विधान केले. वाढता चंगळवाद हा अनेक बाबींसाठी कारणीभूत असून भरकटलेला आजचा युवक, तरुण वर्ग हा आई-वडिलानी आपल्या पाल्यामध्ये मुल्यांची रुजवणूक करणे गरजेचे झाले आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रसिद्धी आणि पैसा यामुळे आजची मुले भरकटू लागली असून दुसर्याशी तुलना केल्याने समस्या निर्माण होत आहे. आपण तंत्रज्ञानाच्या विरोधात नसून ते एक साधन म्हणून उपयुक्त आहे. पाश्‍चिमात्य संस्कृती आज आपण स्वीकारत आहोत. यूज आणि थ्रो ही संकल्पना आजच्या तरूण पिढीत रुजल्या गेल्याने समस्या निर्माण होत आहे. त्यातूनच 2025 पर्यंत जगातील 25 टक्के लोकसंख्या ही मानसिक विकारात राहील, असे वक्तव्य त्यांनी केले. दुसरीकडे दिवसातून किमान तीनदा डीपी बदलणेही मानसिक विकारात मोडते. त्यातून आता नव्याने सेल्फायटीस, फेसबुक अ‍ॅडिक्शन डिसऑर्डर सारखे आजार समोर येत आहेत. आज सोशल मिडीयाचा वापर थिल्लरपणे चालू आहे. वास्तविक सोशल मीडियाने अनेक चळवळी उभ्या केल्या. ‘मीटू’, जेष्ठ नागरिकांची चळवळ अशा अनेक चळवळी उभ्या राहल्या आहेत. ‘मीटू’ चे संदर्भ आणि अन्वयार्थ काहीसे वेगळे आहेत. मात्र, सोशल मिडीयामध्ये ताकद आहे. हे तंत्रज्ञान सकारात्मक दृष्टीकोणातून साधन म्हणून वापरणे योग्य आहे. परंतु, त्याच्या अधीन जाणे तितकेसे योग्य नाही, असेही अच्यूत गोडबोले म्हणाले.