Breaking News

कराडजवळ महामार्गावर अपघात; दोन जण जागीच ठार


उंब्रज (प्रतिनिधी) : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पेरले (ता. कराड) गावच्या हद्दीत सातारा ते कराड जाणार्‍या लेनवर स्वीफ्ट डिझायर कारला पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाले असल्याची घटना शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास घडली.

सचिन संजय वळसे पाटील (वय 30 रा. वारजे पुणे), प्रविण रामचंद्र आढाव (वय 48 रा. कर्वेनगर पुणे) असे अपघातात मयत झालेल्याची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरील माहिती अशी, पुणे ते बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुणे ते कोल्हापूरकडे जाणार्‍या स्वीफ्ट डिझायर कारला पेरले (ता. कराड) गावचे हद्दीत पाठीमागून येणार्‍या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या धडकेत कार पलटी होऊन महामार्गावरुन सुमारे दोनशे फुट लांब शेतात गेली. धडक एवढी भीषण होती कारचा चक्काचूर होऊन कारमधील दोघेजण जागीच ठार झाले.