Breaking News

कठोर परिश्रम हाच यशाचा मूलमंत्र : सारंग परदेशी


साखरखेर्डा,(प्रतिनिधी): कठोर परिश्रम व सरावांमध्ये सातत्य ठेवून जिद्दीने ध्येयाकडे वाटचाल केली तर यश प्राप्ती निश्‍चित होते, असे प्रतिपादन एन.आय.एस. कुस्ती प्रशिक्षक सारंग परदेशी यांनी केले. साखरखेर्डा येथील स्व.भास्करराव शिंगणे कला, प्रा.नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयात वाचन व प्रेरणा दिन व आंतरविद्यापीठ संघात निवड झालेल्या कुस्तीपटूंच्या सत्कार समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बाळासाहेब गावंडे हे होते. पुढे बोलताना त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या या यशाबद्दल कुस्तीपटूचे अभिनंदन करत प्राचार्य डॉ. बाळासाहेब गावंडे यांनी कुस्तीपटूच्या प्रशिक्षण व सरावासाठी निर्माण करून दिलेल्या सुविधा व वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळे ध्येय गाठणे शक्य झाले. तेव्हा पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्यासाठी सकारात्मक पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी. त्यानंतर प्राचार्य डॉ. बाळासाहेब गावंडे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये दडलेले कौशल्य शोधून त्यांना पुढे नेण्यासाठी महाविद्यालय सर्वतोपरी प्रयत्नशील असून आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. कुस्ती सारख्या स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त करणार्‍या पूजा भराड प्रमाणे अन्य विद्यार्थिनींनी सुद्धा पुढे यावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक प्रा. आशिष बरडे यांनी केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाद्वारे आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा 5 ते 8 ऑक्टोबर या दरम्यान माउली इंजिनिअरिंग कॉलेज शेगाव येथे आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये महाविद्यालयाच्या पूजा संतोष भराड या विद्यार्थिनीने 55 किलो वजन गटात सुवर्ण पदक मिळवत आंतरविद्यापीठ संघात आपले स्थान निश्‍चित केले. तसेच 65 किलो वजनी गटामध्ये अक्षय राजेश धानुरे या विद्यार्थ्याने सुवर्ण पदक प्राप्त करून आंतरविद्यापीठ संघात आपले स्थान निश्‍चित केले आहे. तसेच ऋषिकेश बाबासाहेब भालसिंग याने सुद्धा 74 किलो वजन गटात उत्तम प्रदर्शन करत रजत पदक प्राप्त करून आंतरविद्यापीठ संघात आपले स्थान निश्‍चित केले. महाविद्यालयातर्फे कुस्ती स्पर्धेमध्ये पाच विद्यार्थी व तीन विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. सहभागी सर्वच विद्यार्थ्यांनी सेमी फायनल पर्यंत मजल मारीत उत्तम प्रदर्शन केले. महाविद्यालयातील कुस्ती पटूंना सारंग परदेशी एन.आय.एस. कुस्ती प्रशिक्षक व क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक प्रा. आशिष बरडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यापीठ संघात स्थान प्राप्त केल्याबद्दल खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. याप्रसंगी वाचन व प्रेरणा दिनानिमित्त भारतरत्न डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले. त्यानंतर ग्रंथप्रदर्शन भरवण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन दीपाली सुरुशे हिने तर आभार प्रदर्शन ऋत्विक बोबडे याने केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.