Breaking News

‘रयत’च्या प्राचार्यांची चौकशी करा अन्यथा उपोषण : अँड. डूचे


जामखेड श. प्रतिनिधी

येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश उच्च माध्यमिक विद्यालयात इ. ११ वी १२ वी विज्ञान शाखेच्या विनाअनुदानित तुकडीसाठी विद्यालयचे प्राचार्य मनमानी पद्धतीने, बेकायदेशीररित्या दोन्ही वर्षांची एकत्रित १३ हजार रुपये फी विद्यार्थ्यांकडून वसूल करत आहेत. त्यांचे फी धोरण हे रयत शिक्षण संस्थेच्या ध्येयधोरणाविरूध्द असून प्राचार्य स्वतःच्या मनमानी पद्धतीने काम करत असून त्यांची चौकशी करण्यात यावी. अन्यथा जि. प. समोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अँड. ऋषिकेश डूचे यांनी दिला.
यासंदर्भात डूचे यांनी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे, की प्राचार्यांनी महाराष्ट्र शैक्षणिक शुल्क (विनिमय) अधिनियम २०११ चा भंग केला आहे. हिटलरी पद्धतीने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना एकत्रितपणे दोन्ही वर्षांची फी भरायला भाग पाडले. पालकांकडून नंतरहून संमतीपत्र लिहून घेतले. शुल्क ठरविताना शिक्षणाधिकारी यांची मान्यता घेणे आवश्यक असताना प्राचार्य यांनी ती घेतली नाही. तसेच इ. ११ वी प्रवेश प्रक्रिया जि. प. शिक्षण विभागाच्या वेळापत्रकानुसार केली नाही. सदर निवेदनाच्या प्रती शिक्षण उपसंचालक पुणे, सचिव रयत शिक्षण संस्था सातारा, विभागीय अधिकारी रयत शिक्षण संस्था, अहमदनगर, शासनाच्या तक्रार निवारण प्रणाली तसेच गटशिक्षणाधिकारी पं. स. जामखेड यांना पाठविण्यात आल्या आहेत.