Breaking News

पुढील वर्षाचा गळीत हंगाम अडचणीचा : काळे


कोपरगाव / ता. प्रतिनिधी

यावर्षी गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे नवीन ऊस लागवड झालेली नाही आणि पुढील पावसाळ्यापर्यंत होणारही नाही. गोदावरी कालव्याच्या आवर्तनासबंधी कोणत्याही प्रकारचे नियोजन आजपर्यंत झाले नाही. कमी पावसामुळे विहिरींच्या पाणी पातळीत यत्किंचितही वाढ झालेली नाही. सध्याच्या पाण्याची पातळी खालावू लागली आहे. त्यामुळे चालू वर्षीचा गळीत हंगाम कसाबसा पार पडेल. परंतु पुढील वर्षीचा गळीत हंगाम हा अतिशय अडचणीचा ठरणार आहे, असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, युवा नेते आशुतोष काळे यांनी केले.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ. अशोक काळे होते. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे संचालक सचिन चांदगुडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी देवकी यांच्या हस्ते विधिवत पूजा करून पार पडला. याप्रसंगी काळे बोलत होते.

याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील शिंदे, कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप, जनरल मॅनेजर जयंत भिडे, ए. व्ही. काळे, सेक्रेटरी सुनील कोल्हे, ऑफिस सुप्रीटेंडेंट बाबा सय्यद, दौलत चव्हाण, निवृत्ती गांगुर्डे, सूर्यकांत ताकवणे, पं. स.चे सभापती, उपसभापती, सर्व सदस्य, सर्व जिल्हा परिषद सदस्य, कोपरगाव नगर परिषदेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक अरुण चंद्रे व सेक्रेटरी सुनील कोल्हे यांनी केले. उपाध्य्यक्ष सुनील शिंदे यांनी आभार मानले.