Breaking News

उद्धव ठाकरे म्हणजे सर्वाधिक गोंधळलेला राजकारणी!: विखे पाटील


शिर्डी (प्रतिनिधी) : 
केवळ सत्तेत कायम राहण्यासाठी म्हणून शिवसेनेने आपली अब्रू गमावली असून, त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणजे सर्वाधिक गोंधळलेला राजकारणी असल्याची बोचरी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना विखे पाटील यांनी हे विधान केले. 

उद्धव ठाकरे यांनी कालच अहमदनगरमध्ये केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेत्यांनी शिवसेनेच्या ढोंगी भूमिकेवर चौफेर हल्ला चढवला. ते म्हणाले की, आता जनतेप्रती शिवसेनेचा कळवळा म्हणजे एक मोठा जुमला झाला आहे. विरोधी पक्षांना सल्ला देण्यापूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकदा आपल्या फसव्या भूमिकेबद्दल आत्मचिंतन करावे. सरकारवर टीका करायची, मग मांडवली करायची, सत्तेचा मलिदा खायचा आणि पुन्हा त्याच सरकारवर टीका करायची, एवढीच शिवसेनेची मागील 4 वर्षातील कर्तबगारी राहिली आहे.

दुष्काळ जाहीर न झाल्यास रस्त्यावर उतरण्याच्या वल्गना उध्दव ठाकरे करीत आहेत. शेतकरी कर्जमाफी योजनेत घोटाळा झाला म्हणत राज्यभर फिरत आहेत. हे सारे घडत असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री करतात तरी काय? काय फक्त भजे खायला उपस्थित असतात का? असा सवालही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. कर्जमाफी जाहीर झाली तेव्हा या योजनेतील 89 लाख लाभार्थी शेतकर्‍यांची नावे उद्धव ठाकरे मोजून घेणार होते. पण या योजनेचा लाभ न मिळालेल्या राज्यातील सुमारे 1 कोटी शेतकर्‍यांपैकी साधे 89 शेतकरीही त्यांना मोजता आलेले नाहीत. त्यामुळे शिवसेनेची विश्‍वासार्हता आता संपली आहे. म्हणुनच आता रामाचा आधार घेवून उद्धव ठाकरे अयोध्येला निघाले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही ‘जय महाराष्ट्र’शिवाय अन्य कोणत्याही शब्दाने दसरा मेळाव्यातील भाषणाचा समारोप केला नाही. पण आज उद्धव ठाकरे यांच्यावर केवळ राजकीय अस्तित्वासाठी ‘जय श्रीराम’ म्हणण्याची वेळ आली आहे. त्यांनी अयोध्येला जाण्याची नौटंकी करण्याऐवजी जनतेच्या प्रश्‍नांबाबत प्रामाणिक असेल तर आजच सत्तेतून बाहेर पडून दाखवावे, असे आव्हान देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंना यावेळी दिले.