Breaking News

तलवारीने केक कापल्याप्रकरणी युवकाची चौकशी


सातारा (प्रतिनिधी) : सातारा तालुक्यातील लिंब येथे भर चौकात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याच्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ लिंब येथील एका युवकास चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान, या घटनेची चर्चा दिवसभर लिंब परिसरात सुरु होती. 

याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील लिंब येथे शनिवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास काही युवकांचा समूह 10 ते 15 दुचाकीवरुन चौकात आला होता. चौकात येत असताना ते जोराने हॉर्न वाजवत होते. हे युवक मिरवणूक काढतच आले होते. चौकात आल्यानंतर त्यांनी आणलेला केक गाडीच्या सीटवर ठेवून तलवारीने केक कापला. या घटनेची माहिती ग्रामस्थांना समजल्यानंतर गावकरी चौकात जमा झाले होते. गावकरी जमा होवू लागताच त्या युवकांनी तेथून पोबारा केला. याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी लिंब फाटा येथे राहणार्‍या एका युवकास रात्री उशिरा चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले. लिंब येथील दोन युवकांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी सातार्‍यातून काही युवक आल्याची माहिती मिळाली असून पोलीस त्या युवकांचा शोध घेत आहेत.