Breaking News

अवैध धंदेचालकांचे ‘पुढचे पाठ मागचे सपाट’ सुरुच


श्रीगोंदा प्रतिनिधी : 

तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणाऱ्या लोकांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक, तडीपार व हद्दपारची कारवाई केलेली आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाने अवैध धंद्यांवर कारवाई किंवा गुन्हे दाखल केलेले आहेत. मात्र तरीही काही मग्रूर अवैध धंदे करणारे कायदेशीर कारवाई पूर्ण होते न होते तोच हे धंदे चालू करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे अवैध धंदेचालकांमध्ये ‘पुढचे पाठ मागचे सपाट’ असा प्रकार सुरुच आहे. 

श्रीगोंदा शहरातील निव्वळ सिद्धार्थनगर व आसपासच्या परिसरात बहुतांशी गुन्हे दाखल असलेले लोक अवैध दारू बनवून, खुलेआम विक्री करीत आहेत. तसेच बाहेरून दारू व ताडी खरेदी करून विक्री केली जात आहे. पोलीस प्रशासन कारवाई करते आहे. मात्र या अवैध व्यवसायकांना पोलिसांचे भय राहिले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.

सदरील धंदे बंद करण्यासाठी या कार्यक्षेत्रातील बिट अमलदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. जेणेकरून अशा अवैध धंद्यावर पोलीस अधिकाऱ्यांना थेट नियंत्रण आणण्यात यश येईल, अशी बोलकी प्रतिक्रिया येथे ऐकायला मिळत आहे. दरम्यान, काही जाणकार महिलांनी सिद्धार्थनगर येथे सुरु असलेले अवैध धंदे लवकरच संघटित होऊन उध्वस्त करणार असल्याचे माध्यमांना सांगितले आहे. या आंदोलनाआधी पोलीस प्रशासनाने याठिकाणी कारवाई करून ते बंद करावेत, असेही या महिलांचे म्हणणे आहे.